पुणे : सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेसाठी बंडखोरी केल्यामुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सोमवारी कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बैठकीत सहभागी झाले. या निवडणुकीतील काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत थोरात यांचेही नाव होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबरही थोरात यांचे जाहीर मतभेद झाले होते.
कसबा पोटनिवडणुकीत ते येतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, सोमवारी दुपारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावून त्यांनी ही शंका फोल ठरवली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशा तीनही पक्षांचे नेते बैठकीत होते. शहरातील २०० प्रमुख कार्यकर्त्यांना प्रचाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भाजपची धनशक्ती विरुद्ध महाविकास आघाडीची जनशक्ती, असा हा सामना असून, तो सामान्यांच्या बाजूने विजयी व्हावा यासाठी सर्वांनी जिद्दीने प्रचार करावा, मतदारांशी थेट संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. परिसरातील मान्यवरांच्या भेटी, कोपरा सभा, सोसायट्यांमध्ये सभासदांच्या बैठका याद्वारे प्रचार करावा, बेसावध राहू नये, असे सांगण्यात आले. आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.