पुणे : आपल्या मुलाने कोणा मुलींशी बोललेले देखील त्यांना आवडत नव्हते. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हा प्रकार आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या महाविद्यालयीन मुलाला एका मित्राने तुझ्याबरोबर व्हॉटसअपवर झालेले चॅट आईवडिलांना दाखवितो, अशी धमकी देऊन तब्बल अडीच लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एरंडवणा येथे राहणार्या एका ४८ वर्षाच्या व्यावसायिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रितेश सोंडकर नावाचा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा मार्केटयार्डमध्ये व्यवसाय आहे. त्यांना मार्च महिन्यात वार्षिक टॅक्स भरावयाचा असल्याने त्यांनी स्वत:चे व कुटुंबियांचे खात्यात झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. त्यात त्यांच्या महाविद्यालयीन मुलाच्या खात्यातून गुगल पे द्वारे १ लाख ५२ हजार रुपये व प्रत्येकी २५ हजार असे चार वेगवेगळ्या क्रमांकावर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलाला विचारले. त्याने जे सांगितले, त्यामुळे आपल्या अवास्तव बंधनामुळे मुलगा किती भितीखाली वागत होता, हे समजून आले. त्यापोटी त्याने कोणाला न सांगता तब्बल अडीच लाख रुपये घाबरुन दिल्याचे उघड झाले.
फिर्यादी यांच्या मुलाला ऑक्टोबरमध्ये प्रितेश सोंडकर नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने ती स्वीकारल्यावर त्याला स्रेहल गुरव नावाने मेसेज येऊ लागले. त्याने प्रितेश सोंडकर नावाची फेसबुकवरील रिक्वेस्ट माझीच असून मी तुझा व्हॉटसअॅप नंबर त्यावरुनच घेतला असून आपण मित्र म्हणून बोलू असे त्याने सांगितले. व्हॉटसअॅपवर चॅट सुरु झाल्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाने त्याला भेटण्याविषयी विचारले. तेव्हा त्याने मी फुकट भेटत नाही, त्यासाठी १ हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले. मुलाने १ हजार रुपये पाठवले. त्यानंतर त्याने आतापर्यंत केलेले चॅट तुझ्या आईवडिल व फेसबुक फ्रेंडना पाठवतो, असे म्हणून धमकावु लागला. पैशांची मागणी करु लागला.
आपल्या वडिलांना मित्र वगैरे आवडत नसल्याचे मुलाला माहिती असल्याने त्याने भीतीपोटी घरी कळू नये, म्हणून तो मुलगा सांगेल, तसे पैसे देत गेला. त्याने एकूण १ लाख ५२ हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी त्याला पुन्हा मेसेज आला. आता शेवटचे १ लाख रुपये दे. मी पुन्हा तुला त्रास देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या भाचाच्या दुकानात काम करणार्या चौघांच्या नावावर प्रत्येकी २५ हजार रुपये पाठविले. ते पैसे त्याने सांगितलेल्या नंबरवर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी मुलाच्या मोबाईलवरील तो नंबर बंद केला. त्यानंतर त्याने दुकानातील लोकांना त्याला पैसे पाठविण्यास सांगितले होते, त्यांना मेसेज येऊ लागले. फिर्यादीच्या मुलाला मला फोन करायला सांगा नाही तर त्याचे वडिलांना फोन करेल, असे सांगून धमकावत आहे़.डेक्कन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.