पुणे: ‘लोकमत’चा सखी मंच आयोजित ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रम. महिलांची अफाट गर्दी. त्या गर्दीत अडीच वर्षे वयाच्या दोन मुलांची नजर अचानक एका व्यक्तीवर स्थिर झाली. त्या व्यक्तीकडे पाहून त्यांनी एकमेकांकडे पाहिले, परत समोर पाहिले व दोघांनाही एकाचवेळी एकदम बाबा म्हणून हाक मारली.
चित्रपटातच शोभावी अशी ही घटना गुरुवारी सायंकाळी महालक्ष्मी लॉनवर प्रत्यक्षात घडली. सखी मंचचा कार्यक्रम होता. प्रसिद्ध निवेदक आदेश बांदेकर कार्यक्रमात होते. महिलांची अफाट गर्दी जमली होती. या सगळ्या गर्दीला नियंत्रित करत बांदेकर अगदी लिलया त्यांच्यात फिरत होते, बोलत होते. या गर्दीतच एक थोडी प्रौढ महिला जुळ्या मुलांना घेऊन गर्दीच्या मागे उभी होती. ती मुले हळूहळू पुढे आली. ती महिलाही त्यांच्या मागे होती.
पुढे जाता-जाता ही मुले एकदम बांदेकर यांच्याजवळ गेली. त्यांनी टक लावून त्यांच्याकडे पाहिले, परत एकमेकांकडे पाहिले व दोघांनीही एकाचवेळी बाबा म्हणून हाक मारली. बांदेकर त्यामुळे एकदम चमकले. तोपर्यंत ती महिला तिथे आली व तिने मुलांना बाजूला घेतले. हे मला बाबा कसे काय म्हणाले, बांदेकरांनी त्या महिलेला विचारले. त्यानंतरची कहाणी ऐकून त्यांच्या तर डोळ्यात पाणी आलेच पण तिथे उभे असलेल्यांचेही डोळे पाणावले.
ही मुले जुळी. बरोबर होती ती त्यांची आजी. मुलांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यानंतर त्यांची आई निघून गेली. मुलांना आजीच सांभाळू लागली. त्यांचा निधन झालेला मुलगा दिसायला बरोबर बांदेकरांसारखाच होता. त्यामुळे त्या मुलांना वाटले त्यांचा बाबाच आला. म्हणून दोघांनीही एकाचवेळी बाबा म्हणून हाक मारली. ही सगळी कथा ऐकून बांदेकरांनी दोन्ही मुलांना जवळ घेतले. त्यांची विचारपूस केली. त्यांनी दाखविलेल्या या आपुलकीने मुलांची आजीही भारावून गेली.