वडगाव मावळ : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करावे लागले. हातावरती पोट असलेल्या कामगार वर्गाला त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला. रोजची मजुरीत मिळणे बंद झाल्याने रोजचा दिवस ढकलायचा कसा हाच यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. अशाच एका कुटुंबाला माणुसकीहीन मालकाने भाडे दिले नाही म्हणून घराबाहेर काढले. गर्भवती महिलेला सोबत घेत या कुटुंबाने घराच्या निवाऱ्यासाठी फिरता फिरता एक जागा शोधली. वडगाव येथील पोटोबामहाराज मंदिराच्या शेजारी तळ्याकाठी तात्पुरता आसरा मिळाला. आडोसा मिळाला पण खायला अन्न नाही अशा अवस्थेतच त्या कुटुंबातील एका महिलेने एका बाळाला जन्म दिला. या परिस्थितीत एका मुस्लिम युवकाने त्यांना आधार देत महिनाभर पुरेल एवढे सर्व प्रकारचे धान्य भरून दिले.चार कुटूंब साधारण लहान मुलासह वीस ते पंचवीस जण काम मिळेल तिथे राहायचे.लॉकडाऊनमुळे कामे बंद झाली. घरभाडे द्यायला पैसे नसल्याने घर सोडण्याची वेळ आली. निवारा शोधता शोधता वडगाव गाठले.तळयाकाठी मोकळी जागा दिसली. फाटक्या प्लॅस्टिकच्या ताडपत्रीने घरासारखा आडोसा तयार केला. पैसे नसल्याने दोन दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. त्यात एका कुटुंबियात एका महिलेने बाळाला जन्म दिला.
देवतारी त्याला कोण मारी.....
गोरगरीब कुटुंबियांना अन्न धान्य वाटण्यासाठी वडगाव येथील आफताब सय्यद, सतीष ढोरे, नयीम मुलानी यांनी शोध मोहिम सुरू केली.योगायोगाने हे कुटुंब भेटले.त्यांनी सर्व हकिकत सांगितली. या युवकांनी त्या लहान बाळाला दवाखान्यात नेऊन औषध घेऊन दिली.दुधासाठी पैसे तसेच काही दिवस पुरेल एवढे अन्न धान्य व इतर वस्तू दिल्या तसेच राहण्यासाठी त्यांची सोय देखील केली.