पुणे : कर्नाटकमधील आरोग्यमंत्री गुंडू राव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गुंडू राव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी. १५ दिवसांत त्यांच्याकडून यावर उत्तर न आल्यास संबंधिताविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
गुंडू राव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मूलतत्त्ववादी होते व गोहत्या व गोमांस भक्षणास ते अनुकूल होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना यांच्याशी तुलना करताना सावरकर हे जिना यांच्यापेक्षा निम्न विचारांचे होते, असे विधान केल्याने सावरकर कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी राहुल गांधी यांनीही लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकरांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने पुण्यातील जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला होता. आता हे प्रकरण आजी-माजी खासदार-आमदारांविरोधातील दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे कर्नाटकातील आरोग्यमंत्री गुंडू राव यांनी सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त विधान करून वादाला पुन्हा तोंड फोडले आहे.
सावरकरांवर अकारण व निव्वळ विचारधारा भिन्न आहे. म्हणून त्यांना नाहक लक्ष्य करून प्रसिद्धी मिळविली जात आहे. मंत्री गुंडू राव यांनी सावरकर कुटुंबीयांची माफी मागावी अन्यथा न्यायालयात दाद मागण्यावाचून पर्याय राहणार नाही. - ॲड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील