इंदापूर : अजित पवारांसारखा माणूस भाजप शिवसेनेच्या गतिमान सरकारबरोबर आला तर चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण होईल,अशी प्रतिक्रिया व्यक्त करत,त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यावे, यावे असे निमंत्रणच माजी मंत्री शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी शनिवारी (दि.१५) रात्री येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या तीस आमदारांसह भाजपला पाठींबा देणार आहेत. त्यांना घेवून सरकार बनवले जाणार आहे, त्यांना मुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. याच्यासह इदापूर तालुक्याला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळणार आहे. अशा चर्चेने मागील आठवड्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी इंदापूर दौ-यावर असणा-या शिवतारे यांना याच मुद्द्यावरुन विचारणा केली असता,त्यांनी वरील वक्तव्य केले.
शिवतारे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला तर गोष्ट वेगळी आहे. अजित पवार स्वतः वैयक्तिक अशा प्रकारचा पाठिंबा कायदेशीर रित्या देतील असे आपणास वाटत नाही. ते अजित पवार अस्वस्थ आहेत हे नक्की आहे. तीन वर्षे नेतेच जर घरात बसत असतील तर काय निर्णय देणार असा सवाल ही शिवतारे यांनी केला. पहाटेला ते शपथविधीला गेले होते. आता कोणी ही काही सांगत असेल पण अजित पवार काही थोतांड माणूस नाही. कोणीतरी सांगितले म्हणून मी गेलो आणि परत आलो असे होणार नाही. त्यावर अजिबात विश्वास नाही. जे चालले होते ते ठीक नव्हते, म्हणून ते तिकडे गेले होते,असे शिवतारे म्हणाले.
त्यांनी आमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत यावे
भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना महाराष्ट्राचा प्रांतीय पक्ष आहे. अजित पवार जर अशा गतिमान सरकारबरोबर आले तर चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण होईल. पण शेवटी तो त्यांचा निर्णय आहे, आणि राजकारणात कधी असे ही होते की काय आहे नि काय नाही, याच्यापेक्षा अनेक वावड्या उडवल्या जातात. त्यामुळे मी काही बोलणे,त्यांना अडचणीचे होईल असे करणे योग्य नाही. मात्र एक नक्की की, अजित पवारांसारखा माणूस आला तर कोणाला नाही आवडणार. त्यांनी आमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत यावे,असे शिवतारे म्हणाले.