योगेश बाजीराव मांढरे (रा. शिंदवणे, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार,रेणुका व योगेश यांचा विवाह ९ जून २०१० रोजी झाला आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहेत. प्रापंचिक कारणांवरून दोघांत नेहमी वाद होत असल्याने जानेवारी २०१८ पासून रेणुका माहेरी राहत आहे. तिची मुले पतीकडे असून एक वर्षापूर्वी दोघांनी विभक्त होण्यासाठी शिवाजीनगर, पुणे येथील न्यायालयात घटस्फ़ोटाचा दावा दाखल केला आहे.
गुरुवारी (दि. ११) न्यायालयात तारीख असल्याने रेणुका तिचे वडील रामदास खोरे यांचेसमवेत योगेश याच्या घरी गेल्या. त्या वेळी दीर ओंकार यांस मुलेे माझ्याकडे द्या, पुढील तारखेला घेऊन येते असे तिने सांगितले. दीर ओंकार याने त्यांना होकार दिला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती मुुलांना नेण्यासाठी शिंदवणे येथे आली. सासूच्या खोलीतून मुलांना घेत असताना पती हातात लोखंडी कोयता घेऊन आला व मुलांना घेऊ नको असे म्हणून कोयत्याने तिच्या डोक्यात व दोन्ही हातावर वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे रेणुका या मागील दरवाजाने पळत घराबाहेर गेल्या. पती तिचेमागे आला. तिचे वडिलांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांच्यावरही योगेशने हल्ला केला. त्यामुळे ते दोघे घाबरुन अंधारात पळाले. ही बाब रेणुका यांचा दीर ओंकार यांस कळताच त्याने रेणुका यांच्या मोबाईलवर संपर्क साधून गाडी पाठवली. पुढील उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनास्थळी हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे - पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी भेट दिली आहे. पुढील तपास उरूळी कांचन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे करत आहेत.
--