पुणे : भुतदयेचा प्रत्यय पुण्यातील महंमदवाडी येथील नागरिकांनी शनिवारी रात्री आला. पाण्याच्या शाेधात 60 फूट खाेलीत कुत्र्याचे पिल्लू पडले अन त्याला वाचविण्यासाठी 34 वर्षीय जाहेर चाैधरी हे कसलाही विचार न करता विहीरीत उतरले. उतरताना त्यांचा ताेल गेला अन ते विहीरीत काेसळले. यात त्यांच्या डाेक्याला मार लागला. नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी चाैधरी आणि कुत्र्याच्या पिल्लाला सुखरुप विहीरीबाहेर काढले. दाेन दिवसापूर्वी औरंगाबाद येथे अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात न नेता त्याचे लाेकांनी व्हिडीओ शुटींग काढून आपला निर्दयीपणा दाखवलेला असताना काल चाैधरी यांनी कुत्र्याच्या पिल्लासाठी आपला जीव धाेक्यात घातल्याने त्यांच्या भुतदयेचे सर्वांनीच काैतुक केले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री महंमदवाडी येथील एका विहीरीत रात्री 11 च्या सुमारास कुत्र्याचे पिल्लू पडले. या पिल्लाला वाचविण्यासाठी जाहेर चाैधरी हे थेट विहीरीत उतरले. विहीर साधारण 60 फूट खाेल हाेती. विहीरीत उतरताना त्यांच्या ताेल गेल्याने ते विहीरीत पडले. त्यांचे डाेके एका दगडावर अदळल्याने त्यांना मार लागला. अशातच त्यांनी स्वतःला सावरत कुत्र्याच्या पिलाला वाचवले. ते पिल्लाला घेऊन एका कठड्यावर थांबले, परंतु त्यांना विहीरीबाहेर पडता येणे शक्य नव्हते. नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबातची माहिती दिली. काेंढवा बुद्रुक अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीरीची पडझड झाली असल्याने चाैधरी यांना वाचविण्यात अडचणी येत हाेत्या. जवानांनी बादलीला दाेरी बांधून ती विहीरीत साेडली. चाैधरी यांनी पिल्लाला त्या बादलीत साेडले. जवानांनी पिल्लाला सुखरुप विहीरीबाहेर काढले. त्यानंतर पुन्हा दाेरी विहीरीत साेडण्यात आली. चाैधरी यांना दाेरी कंबरेभाेवती बांधण्यास सांगण्यात आले. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना जवानांनी हेल्मेट दिले. दाेरीच्या सहाय्याने चाैधरी यांना विहीरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्ण्यालयात दाखल केले.
तांडेल कैलास शिंदे, फायरमन रफीक शेख, शंकर नाईकनवरे, किशाेर माेहिते यांनी ही कामगिरी पार पाडली.