पुणे : बँकेत खातेदारांनी भरलेला धनादेश कॅशियरची नजर चुकवून चोरुन नेला आणि दुसऱ्या दिवशी त्याच बँकेत तो वठविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारे चोरट्याने साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कोंढवा पोलिसांनी दाखल केला आहे.
याबाबत बँक ऑफ बडोदाच्या कोंढवा शाखेतील व्यवस्थापक राकेश सहाय यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँकेतील रोखपाल जेवायला गेल्या असताना चोरट्याने तेथे ठेवलेले दोन धनादेश चोरुन नेले. त्यानंतर दुसर्या दिवशी हा चोरटा पुन्हा बँकेत आला. त्याने ज्या खातेदाराच्या नावाने धनादेश होते, त्यांच्या नावाचे बनावट पॅन कार्ड तयार करुन त्याची प्रत जोडली. आपल्याच बँकेतून चोरीला गेलेले धनादेश पुन्हा वठण्यासाठी आले असताना बँकेतील कर्मचाऱ्यांनी हे साडेतीन लाखांचे धनादेश वटविले.
ही घटना २४ व २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर व्यवस्थापक राकेश सहाय यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बँकेचे दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. त्यात चोरटा डोक्यावर टोपी घालून आल्याचे व धनादेश घेऊन जात असल्याचे दिसत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे डेक्कन येथील एका बँकेतून चोरट्याने खातेदाराचा भरलेला धनादेश चोरला व काळेवाडी येथील दुसर्या बँकेत खाते उघडून तेथे वठविल्याचे उघड झाले होते.