पुणे : आपल्याकडील दुचाकी तो ओएलएक्स या खरेदी विक्रीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर विक्री करायचा़. त्यानंतर आपल्याकडील दुसऱ्या चावीने ज्याला गाडी विकली, ती चोरुन पुन्हा तिसऱ्याला गाडी विकण्याचा प्रताप करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे़. दर्शन जयकुमार अग्रवाल (वय ३४, रा़ काळाराम मंदिर, नाशिक) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी राहुल नथुजी कुमेरिया यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. दर्शन अग्रवाल हा गाडी चोरी करण्यात अतिशय पटाईत असून, ज्याला गाडी विक्री केली आहे. त्याची तो सुरूवातीला माहिती घेत असे. त्यानंतर बनावट चावीने गाडी चोरी करून फरार होत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कुमेरिया हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्यांना सेकंड हॅण्ड दुचाकी खरेदी करावयाची होती. त्यासाठी १५ नोव्हेंबरला त्यांनी ओएलएक्स वेबसाईटवर दुचाकीची माहिती सर्च करुन दर्शनशी ऑनलाईन व्यवहार करीत मोपेड दुचाकी खरेदी केली. मात्र अवघ्या ३ दिवसांनी १९ नोव्हेंबरला ते कामावर असताना पार्किंगमधून त्यांची दुचाकी चोरीला गेली़ त्यांच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच त्यांना ज्या दर्शनने ही गाडी विकली होती़. त्यानेच चोरुन नेली असावी, अशा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले़. येरवडा पोलिसांचे एक पथक नाशिक येथे जाऊन त्यांनी दर्शन याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले़. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपल्याकडील दुसऱ्या चावीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली़. तसेच त्याने कमी किंमतीत दुचाकी विक्री करण्याच्या बहाण्याने विमाननगर आणि वाघोली येथील दोघांकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक केल्याचे देखील सांगितले.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक बलभिम ननवरे, सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, हवालदार हणमंत जाधव, पंकज मुसळे, मनोज कुदळे, सचिन रणदिवे, नवनाथ मोहिते, कानिफनाथ कारखेले, समीर भोरडे यांच्या पथकाने केली.
तो चोरायचा खरेदी विक्रीच्या साईटवर स्वत:च विकलेली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 9:14 PM