पुणे : तरुणाच्या जामिनासाठी केलेला खर्च वसुलीसाठी सराईत गुंडाने घरात शिरून तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश नानाभाऊ लंके (वय ४७, रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी उषा विभीषण काळे (वय ३८, रा. आनंद पार्क, धानोरी रोड) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रकाश लंके हा सराईत गुन्हेगार आहे. काळे यांचा मुलगा लंकेबरोबर राहतो. त्याला सोडविण्यासाठी १ लाख २० हजार रुपये खर्च केले असे लंके याचे म्हणणे आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी लंके काळे यांच्या घरात शिरला. त्याने तुमचा मुलगा कोठे आहे, ते सांग, नाही तर मी तुमचे खानदान संपवून टाकीन, असे म्हणून लोकांना दमदाटी केली. त्यानंतर काळे यांना तुमचा मुलगा माझ्या ताब्यात दे नाही तर मला १ लाख २० हजार रुपये दे, असे म्हणून त्यांना व त्यांच्या सासू शालन काळे यांना शिवीगाळ केली. तेव्हा फिर्यादी यांनी आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर त्याने हात पाय तोडून टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या घरातील भिंतीवर काहीतरी मारून लाईटचा बोर्ड तोडला. घरातील सामानाची आदळआपट केली. विश्रांतवाडी अधिक तपास करीत आहेत.