पुणे : आराेग्याचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनिल कुकडे यांनी सायकलवरुन पुणे ते विषाखापट्टणम पर्यंत 1355 किलाेमीटरचा प्रवास केला. दरराेज 200 किलाेमीटर सायकलिंग करुन हा प्रवास 70 तासांमध्ये पूर्ण केला. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांनी काेणाचीही मदत घेतली नाही. एकट्याने हा संपूर्ण प्रवास केला असून, यातून त्यांना आराेग्याचा संदेश द्यायचा आहे.
पुण्यात एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कुकडे यांनी 2014 साली मॅरेथाॅन मध्ये भाग घेतला. त्यानंतर त्यांनी पुढील अनेक वर्षे मॅरेथाॅनमध्ये सहभाग घेतला. 42 किलाेमीटरच्या मॅरेथाॅनही त्यांनी वेळेत पूर्ण केली. आराेग्य उत्तम राखण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सायकलींग गरजेचे असल्याने त्यांनी पुढे सायकलींग सुरु केली. त्यातही त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पुणे -पाचगणी-पुणे, पुणे - काेल्हापूर - पुणे अशा अनेक टास्क त्यांनी पूर्ण केले. न थांबता त्यांनी हे अंतर पार केले. त्यानंतर त्यांनी आराेग्याचा संदेश देण्यासाठी साेलाे राईड करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पुणे ते विशाखापट्टणम हा 1355 किलाेमीटरचा मार्ग निवडला.
15 डिसेंबर 2018 ला त्यांनी या राईडला सुरुवात केली. दरराेज तब्बल 200 किलाेमीटरचा टप्पा ते पार करत गेले. रात्री केवळ विश्रांतीसाठी थांबत हाेते. सकाळी पुन्हा निघत असत. सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत ते प्रवास करत. या प्रवासात त्यांची कुठेही सायकल खराब झाली नाही की ते आजारी पडले. आराेग्याचा संदेश द्यायचा या एका ध्येयासाठी ते प्रवास करत हाेते. या प्रवासात त्यांना अनेक लाेक भेटले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या या राईडवरुन प्रभावीत हाेत त्यांनी त्यांच्यासाेबत सेल्फी देखील घेतले. अवघ्या सात दिवसांमध्ये त्यांनी पुणे ते विशाखापट्टणम हे अंतर पार केले.
कुकडे लाेकमतशी बाेलताना म्हणाले, सध्या पाहिलंत तर सर्वत्र वाहनांची संख्या वाढतीये. प्रदूषणात माेठ्याप्रमाणावर वाढ हाेतीये. तसेच ट्रॅफिकमध्ये अडकून अनेकांचा वेळ देखील वाया जात आहे. यात नागरिकांचे आराेग्य देखील धाेक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आराेग्याचा संदेश देण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत हा देखील संदेश लाेकांपर्यंत जावा यासाठी पुणे ते विषाखापट्टणम सायकलींग करण्याचा निर्णय घेतला. मी दरराेजच्या जीवनात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करताे. त्यामुळे आराेग्य चांगले राहण्यास मदत हाेते व ट्रॅफिक मध्ये अडकावे लागत नसल्यामुळे वेळही माेठ्याप्रमाणावर वाचताे. म्हणून माझे नागरिकांना आवाहन आहे की त्यांंनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा.