पुणे : आराेग्य, शांती, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पुण्यातील अवलीयाने तीस दिवसात तब्बल 6 हजाराहून अधिक किलाेमीटरचा सायकल प्रवास केला आहे. यामध्ये त्यांनी भारतातील 50 हून अधिक महत्त्वाच्या शहरांमधून प्रवास केला. तसेच 13 राज्यांना भेट दिली.
सुनील कुकडे असे त्यांचे नाव आहे. सुनील हे आपल्या सायकलिंगमधून नेहमीच आराेग्याचा संदेश देत असतात. यंदा त्यांनी हाेप ( हेल्थ, ऑप्टिमिझम, पीस, एनवायरमेंट) चा संदेश दिला. त्यांनी भारतातील सुवर्ण चतुर्भूज महामार्गावरुन प्रवास करण्याचा निर्णय घेतला. 2 डिसेंबर राेजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी या प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली. सायकल आणि पाठीवर कपड्यांच्या बॅगेसाेबत प्रवासाला निघाले. पुणे - मुंबई- अहमदाबाद- जयपुर- नवी दिल्ली- कानपूर- वाराणसी-काेलकाता- भुवनेश्वर- विषाखापट्टणम- चैन्नई- बंगळूर- काेल्हापूर- पुणे असा त्यांनी सहा हजार दाेनशे पंच्चावन्न किलाेमीटरचा प्रवास केला. हा प्रवास करण्यासाठी त्यांना 30 दिवस लागले. दरराेज त्यांनी दाेनशे ते अडीचशे किलाेमीटरचा प्रवास केला.
या प्रवासात त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. विशेष म्हणजे या संंपूर्ण प्रवासात त्यांची सायकल एकदाही पंक्चर किंवा नादुरुस्त झाली नाही. जेव्हा नागरिकांना त्यांच्या प्रवासाबाबात माहिती हाेत असे तेव्हा नागरिक त्यांचे अभिनंदन आणि काैतुक करत हाेते. तसेच त्यांना पुढच्या प्रवासासाठी प्राेत्साहन देखील देत हाेते. भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतींचा कुकडे यांना अनुभव घेता आला. ज्या ठिकाणी ते थांबत त्याठिकाणी आराेग्याचा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत हाेते.