लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भावी पत्नीने दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये, तसेच त्याच्याशी लग्न करू नये, म्हणून तरुणीला जेवायला नेण्याच्या बहाण्याने बंद फार्म हाऊसवर नेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
आरिफ इसाक शेख (वय २९, रा. मेयफेअर एलिगेट, ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका २७ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणी आणि आरोपी आरिफ शेख यांचे लग्न जमले आहे. या दरम्यान, शेख याने आपल्या भावी पत्नीकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून ११ लाख रुपये घेतले आहेत. १६ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी यांना शेख याने जेवण्याच्या बहाण्याने सासवड रोडच्या कडेला असलेल्या एका बंद फार्म हाऊसवर नेले. तेथे फिर्यादी यांनी दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये तसेच त्याच्याशी लग्न करु नये असे त्याने सांगितले. त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर त्याने जड वस्तूने या तरुणीच्या डोक्यामध्ये वार केला. तसेच चॉपरसारख्या हत्याराने गळ्यावर, मानेवर, हातावर, दंडावर, मांडीवर वार करून गंभीर जखमी केले. यावेळी या तरुणीने आपण पुन्हा पैसे मागणार नाही, असे सांगितल्यावर त्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. तरुणीला मारहाण झाल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे केली होती.
फिर्यादींवर उपचार झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर खरा प्रकार समोर आला. फिर्यादीने आता तक्रार केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरिफ शेख याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.