ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : आपले सत्व पणाला लावून यमदूताकडून आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणले ही सत्यवान - सावित्रीच्या प्रेमाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेच. सावित्रीचे त्याग, तिचे पतीप्रेम याकडे आपण आदर्श म्हणून पाहताे. मात्र, दाेन्ही किडन्या (मूत्रपिंड) निकामी झालेल्या पत्नीला स्वत:ची किडनी देऊन तिला मृृत्यूच्या दाढेतून खेचून आणत नवजीवन बहाल करण्याचा आदर्श एसटीमधील एका मेकॅनिक असलेल्या पतीने घालून दिला आहे. नंदाराम माेहनदुळे असे या आधुनिक सत्यवानाचे नाव असून, स्वत:चा फारसा विचार न करता त्याग करणारे नंदाराम हे व्हॅलेंटाइन दिनानिमित्त त्यांच्या पत्नीसाठी खरे ‘व्हॅलेंटाइन’ ठरले आहेत.
माेहनदुळे दाम्पत्य हे पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील तळेघर गावात राहतात. नंदाराम (वय ५२) हे नारायणगाव एसटी डेपाेमध्ये मेकॅनिक आहेत तर त्यांची पत्नी शांता (वय ४२) या गृहिणी आहेत. त्यांना शुभम व प्रणव ही दाेन मुले आहेत. शांता यांना २००६ पासून डाेकेदुखीचा त्रास चालू झाला. त्याचे निदान करण्यासाठी त्यांनी काही तपासण्या केल्या; पण निदान झाले नाही. मग त्यांना स्थानिक डाॅक्टरने औषधाेपचार सुरू केले. त्या खाल्ल्या की तात्पुरते बरे वाटायचे. असेच पाच-दहा वर्षे निघून गेले. सन २०१५ नंतर त्यांना हा त्रास आणखी वाढला. यामध्ये उलट्या हाेणे, ताप, कणकण व थकवा असा त्रास व्हायला लागला. अलीकडे हा पाय सुजणे, अंग खाजणे असाही त्रास वाढला. मग त्यांनी २०२१ मध्ये राजगुरूनगर येथे एका किडनीविकारतज्ज्ञाचा सल्ला घेतला असता, त्यांच्या दाेन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून आठवड्यातून तीन वेळा डायलिसिसही सुरू झाले; परंतु या आजारपणामुळे त्यांचे पूर्ण घरच डिस्टर्ब झाले. शेवटी किडनी प्रत्याराेपण करणे हाच एक पर्याय हाेता. किडनी प्रत्याराेपण शस्त्रक्रियेसाठी त्यांनी काेरेगाव पार्क येथील बुधराणी हाॅस्पिटलमध्ये संपर्क साधला. येथील अवयव प्रत्याराेपण समन्वयक ज्याेती शिरीमकर यांनी त्यांचे समुपदेशन केले. त्यावेळी किडनी देण्यासाठी काेणाचीही वाट न पाहता नंदाराम स्वत:हून पुढे आले व तपासणीअंती त्यांची किडनीदेखील मॅच झाली व किडनीविकारतज्ज्ञ डॉ. भूपेश कवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावर्षी १९ मे राेजी ही शस्त्रक्रिया पार पडली. किडनी प्रत्याराेपणमुळे शांता यांची तब्येत आता स्थिर आहे.
माझ्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा मला खूप अभिमान
माझ्या दाेन्ही किडन्या निकामी झाल्याने मला प्रचंड त्रास हाेत हाेता. ताे त्रास आमच्या ‘यांना’ पाहवत नव्हता. जेव्हा राेगाचे निदान झाले आणि किडनी प्रत्याराेपण करावे लागेल, हे निश्चित झाले, तेव्हा त्यांनी आपल्या जीवाची काेणतीही पर्वा न करता, स्वत:ची किडनी देण्याचा निर्धार डाॅक्टरांना बाेलून दाखविला. त्यावेळी माझी बहीण आणि मुलेही किडनी देण्यास तयार हाेते, पण आपल्या निर्धारापासून माझे पती मागे हटत नव्हते. त्यांनी केलेल्या किडनीदानामुळे मला नवजीवन लाभले असून, माझ्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा मला खूप अभिमान वाटताे. - शांता माेहनदुळे
मी किडनीदानाचा निर्धार पक्का केला
आपला माणूस हा आपला असताे. ताे शेवटपर्यंत आपल्यासाेबत राहावा, अशी इच्छा प्रत्येकाची असते. जशी आपल्या मुलांना आई ही नेहमीच हवीहवीशी असते, तशी म्हातारपणात भाकर तुकडा घालणारी अर्धांगिनी हवी असते. त्यामुळे माझ्या कामाचे स्वरूप विचारात घेता, मी किडनीदान करू नये, असे अनेकांनी सांगूनही मला ते पटत नव्हते. रुग्णालयात किडनीदानासंदर्भात याेग्य समुपदेशन केले आणि मी किडनीदानाचा निर्धार पक्का केला. या काळात नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी यांनी मला सपाेर्ट केला. किडनीदान केल्यानंतर कामावरही मला अनेक सहकारी जड वस्तू उचलून देत नाहीत, अशी काळजी घेतात. - नंदाराम माेहनदुळे