पुणे : तीस वर्षीय समीर सुरुवातीला थाेडी दारू प्यायचा. मात्र, ते व्यसन सहा महिन्यांत खूपच वाढले. त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार यायचा. घरच्यांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील मानसाेपचार तज्ज्ञांना दाखवले. डाॅक्टरांनी त्याचे वैद्यकीयदृष्ट्या मूल्यांकन केले असता दारू पिण्याचे कारण हाेते, त्याला आलेले नैराश्य. डाॅक्टरांनी त्याच्या व्यसनाधीनतेसह या मानसिक आजारांवरही उपचार केल्याने ताे व्यसनाधीनतेतून बाहेर पडला आहे.
मानसिक आजारांबाबत समाजात जागृती करण्यासाठी दरवर्षी १० ऑक्टाेबर हा जागतिक मानसिक आराेग्य दिन म्हणून पाळला जाताे. मानसिक आजारांची कारणे वेगवेगळी असतात; परंतु व्यसनी लाेकांना मानसिक आजार असल्याचे आढळून येत आहे. दारूच्या आहारी गेलेल्या बहुतांश म्हणजेच ६० ते ७० टक्के जणांना काही ना काही मानसिक आजार आढळून येत असल्याचे मानसाेपचार तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केवळ त्याच्या व्यसनाधीनतेवर नव्हे तर त्याच्या या मानसिक आजारावरही उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळे नातेवाइकांनी केवळ दारूसाठी नव्हे तर त्याचे मानसिक आजारांचे निदान करण्यासाठी मानसाेपचारतज्ज्ञांना दाखवणे गरजेचे असते.
बाॅर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसाॅर्डरमध्ये त्यांच्या स्वभावातच दाेष असताे. त्यातून ताे वारंवार त्या व्यसनाकडे ओढला जाताे. तसेच इंपल्सिव्ह म्हणजे त्यांच्यामध्ये तारतम्य नसते. एकाचवेळी खूप दारू पिणे, पत्ते खेळणे असे दिसून येते. हायपर सेन्सिटिव्ह ज्यामध्ये ताे रागात त्याच्या किंवा स्वत:च्या जीवाला बरेवाईट करताे. यामध्ये स्वत:च्या हातावर वार करणे असे प्रकार दिसून येतात. तसेच, इतरांना इजा करणाऱ्यांमध्ये अँटी साेशल डिसाॅर्डर असल्याचे दिसून येते.
काेणते मानसिक आजार आढळतात
- व्यसनी लाेकांमध्ये बहुतांश नैराश्य म्हणजेच डिप्रेशन.- बाॅर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसाॅर्डर, अँटी साेशल डिसाॅर्डर, अस्वस्थता व इतरही मानसिक विकार.- मानसिक विकारातून ते दारू प्यायला लागतात किंवा दारू प्यायला लागल्यामुळेही काहींना मानसिक आजार जडतात.
...म्हणून पितात दारू
डिप्रेशन किंवा नैराश्य असलेल्यांमध्ये त्यांना दारू घेतल्यावर ठीक वाटते. त्यांची अस्वस्थता, बैचेनी दारू घेतल्यावर कमी हाेते. यामध्ये वर्षानुवर्षे घेतलेली असतात. त्यामुळे त्यावर ते अवलंबून हाेतात. अशा रुग्णांना आठवडाभर दारूतून बाहेर पडण्यासाठीचे औषधाेपचार देण्यात येतात. त्यानंतर मानसिक आजारांवर उपचार केले जातात, अशी माहिती मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. विक्रांत हजारे यांनी दिली.
''वायसीएम रुग्णालयाच्या मानसाेपचार विभागात मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी राेज ४० ते ५० रुग्ण येतात. त्यापैकी व्यसनी असलेल्यांची संख्या जास्त असते. व्यसनींमध्ये बहुतांश जणांना नैराश्य असल्याचे दिसून येते. इतरही मानसिक आजार दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या मानसिक आजारांवरही उपचार करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी दारू पिणाऱ्या व्यसनी व्यक्तींना मानसाेपचार तज्ज्ञांना दाखवून त्याला इतर काही मानसिक आजार आहे का, हे देखील पाहावे व उपचार करावेत. - डाॅ. मनजित संत्रे, विभागप्रमुख, मानसाेपचार विभाग, वायसीएम रुग्णालय''