पुणे : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यांचा संदर्भ घेत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच मराठा आरक्षण आणि पाच मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापुरात उद्या राज्य सरकारला आव्हान देत खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाचे शस्र उपसले आहे. मात्र, याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.
पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. पवार म्हणाले, त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही. त्यांना मराठा, ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं वाटतंय. मात्र, त्यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. तसेच मानाच्या दिंड्यांना विश्वासात घेऊनच बसने वारी करण्याचा मार्ग काढलेला आहे. काही पक्षीय लोकं वेगळं काहीतरी निष्पन्न व्हावं असं वाटतं अशा शब्दात विरोधकांवर टीका केली आहे.
कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मूक मोर्चावर भाष्य करताना त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मोर्चास्थळी जाणार आहे. त्यावेळी ते भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यपाल आणि पंतप्रधान यांना भेटलो आहोत. ५ जुलैला अधिवेशन आहे,त्यात नवीन विषय घेण्यात येईल.
नाना पटोलेंनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवायचं ठरलं आहे. नानांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार, पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सोनियाजी, उद्धव ठाकरे, आणि शरद पवार साहेबांनी एकत्र येत हे सरकार स्थापन केलं आहे.
मराठवाड्यात १२८ एकर जमीन राज्याने टेंडर काढलं होतं. त्याचा उपयोग मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या आत आला म्हणून कोरोना निर्बंधात शिथिलता आणली आहे. जर कोरोना रुग्णसंख्या वाढली तर कठोर निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.
राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपावर भूमिका स्पष्ट करताना जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी असे अजित पवार यांनी सांगितले.