पुणे : तब्बल 19 वर्षे फरार असणाऱ्या अट्टल घरफाेड्याला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. संजय नामदेव कांबळे (वय 48 रा. गांधीनगर देहुराेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कांबळे याच्यावर समर्थ पाेलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. 2000 सालापासून गेली 19 वर्षे ताे फरार हाेता. पाेलीस नाईक महेश निंबाळकर यांनी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आराेपीला अटक केले.
संजय कांबळे हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याचे साथीदार मिलींद पवार, निलेश चाैगुले, सुभाष महामुनी, अनंतर सिदाडकर यांना पाेलिसांनी पूर्वीच अटक केली हाेती. यापैकी मिलिंद पवार, निलेश चाैगुले व संजय कांबळे याच्यावर पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मिळून 150 च्या वर घरफाेडीचे गुन्हे दाखल आहेत. कांबळेचे इतर साथीदार हाती लागले असले तरी कांबेळे पाेलिसांच्या हाती लागत नव्हता. गेली 19 वर्षे पाेलीस त्याचा शाेध घेत हाेते. शनिवारी कांबळे हा तळेगाव दाभाडे येथे येणार असल्याची बातमी पाेलीस नाईक महेश निंबाळकर यांना मिळाली. निंबाळकर यांनी गुन्हे शाखेचे अप्पर पाेलीस आयुक्त अशाेक माेराळे, पाेलीस उप-आयुक्त शिरीष देशपांडे, सहाय्यक पाेलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखील सापळा रचत आराेपी कांबळेला ताब्यात घेतले. तसेच पुढील कारवाईसाठी समर्थ पाेलिसांकडे साेपवले.