लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पॉस्कोअंतर्गत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी साडेतीन वर्षे कारागृहात असलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. घटनेच्या वेळी पीडित मुलीचे वय १७ वर्षे होते हे पुराव्यानिशी सरकारी वकिलांना सिद्ध करता न आल्याने आरोपीला निर्दोष मुक्त करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. आर. भांगडिया झंवर यांनी दिले.
अमोल सुखदेव नेमाडे (वय २२, रा. गणेशनगर येरवडा) असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार एका अल्पवयीन पीडित मुलीने लोणावळा सिटी पोलीस ठाण्यात केली होती. पीडिता आणि आरोपी एकाच केटरिंग ग्रुपमध्ये काम करीत होते. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जानेवारी, एप्रिल आणि मे २०१६ मध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप होता. त्यातून ती गर्भवती राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. २०१८ मध्ये देखील आरोपीने शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितीने फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
आरोपीवर भारतीय दंडविधान कायदा कलम ३७६ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ७, ८,११ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कच्चा कैदी म्हणून साडेतीन वर्षे कारागृहात होता. विशेष पॉस्कोअंतर्गत या दाव्यावर सुनावणी झाली. सरकारी वकील प्रमोद बोंबाटकर आणि आरोपीच्या बाजूने अॅड. आशिष पाटणकर यांनी काम पाहिले. सरकारी वकिलांनी सात साक्षीदार तपासले. ही घटना घडली त्यावेळी पीडितेचे वय १७ वर्षे होते. मात्र सरकारी वकिलांना त्याबाबत ठोस पुरावा सादर करता आला नाही. दरम्यान, या घटनेत पीडितेच्या आई-वडिलांसह तिच्या जन्मतारखेसंबंधी पोलिसांना प्रमाणपत्र देणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांची देखील तपासणी करण्यात आली नाही आणि तिची जन्मतारीख देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेली नाही.
शाळेचे रजिस्टर हे सार्वजनिक दस्ताऐवज असू शकत नाही. त्यामुळे ते ग्राह्य धरता येणार नाही. आरोपी यात दोषी आहे हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आलेले नाही. पीडित मुलगी एकदा म्हणते की लग्नाचे आमिष दाखवून तिच्या संमतीने संबंध ठेवण्यात आले आणि दुसरीकडे आपली संमती घेण्यात आली नाही असे म्हणते, असा युक्तिवाद अॅड. पाटणकर यांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जर पीडितेच्या जबाबमध्ये तिने अमोल याच्या आडनावाचा उल्लेख केला नाही तर कोणत्या आधारावर आरोपीला पकडले, असे सांगत न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना फटकारले. त्यामुळे न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
--------------------------