पुणे : भारतीय संस्कृती आणि इतर देशांची संस्कृती यात फरक आहे. जो शक्तिशाली तो जगेल, ही परकीय संस्कृती आहे, तर आपली भारतीय संस्कृती जो जन्माला आला तो जगेल आणि समाज त्याला जगवेल, अशी आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने साडेचार तासांमध्ये ८९२ दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. या विक्रमाची गिनीज बूकमध्ये नोंद झाली. या नोंदीचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दोन- तीन वर्षांत पुण्यात अनेक वेळा विश्वविक्रमाच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमास आलो. मात्र, आजचा कार्यक्रम वेगळा आहे. हा कार्यक्रम समर्पक सेवेचा आहे. सेवेचा विचार घेऊन काम करणाऱ्या संस्थांना कोणत्याही विश्वविक्रमाची गरज नसते. विश्वविक्रमाचा दिवस हा त्यांच्या प्रवासातील एक दिवस असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकलांगांना दिव्यांग असे नाव दिले आहे. त्यामुळे संस्थेच्या नावात विकलांग शब्दाऐवजी दिव्यांग हा शब्द वापरावा. शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. सरकारने कितीही योजना आणल्या तरी त्या योजनांमध्ये सामाजिक संस्था जोवर सहभाग घेत नाहीत, तोपर्यंत त्या यशस्वी होत नाहीत. दिव्यांगांसाठी बरेच काही केले आहे. आपणास आणखी काम करायचे आहे. त्यांच्यासाठी तयार केलेले कायदे व नियम शासकीय यंत्रणाच पाळत नाही. ते पाळावेत यासाठी कारभारात सुगमता आणली जाणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.