लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : बेशिस्त वाहने, अवैध वाहनतळ, रस्त्यावर असनाऱ्या नियमबाह्य खाद्यपदार्थांच्या गाड्या यामुळे सासवड शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीत वाढ होत चालली आहे. तालुक्याचे प्रमुख ठिकाण म्हणून सासवडला तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, बेशिस्त चालक आणि वाहतूक व्यवस्थापनाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नारायणपूरला जाणाऱ्या वडाप गाड्या बाजारपेठेतून भरधाव वेगाने चालक दामटत असतात. बेदरकार वाहनचालकांमुळे वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणार तरी केव्हा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. जेजुरी नाक्यापासून बस स्टँडपर्यंत तसेच शहरातील प्रमुख मार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग असते. मुख्य बाजारपेठेतील मार्गाच्या दोन्ही बाजूस निम्म्या रस्त्यापर्यंत वाहने पार्क केलेली असतात़ परिणामी या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होते़. त्याचबरोबर काही व्यावसायिकांनी तर पदपथावरच दुकाने थाटली आहेत. यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. मुख्य महामार्गावर होत असलेले भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण कारवाईनंतर पुन्हा जैसे थे झालेले आहे. हे अतिक्रमण लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या मार्गाची पाहाणी करणे गरजेचे आहे. अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना त्यांनी त्वरित साहित्य हटविण्याबाबतसूचना द्यायला हव्यात. तसेच अस्ताव्यस्तपणे पार्किंग होत असलेल्या ठिकाणी सम-विषम पार्किंगची शिस्त लावायला हवी. म्हाडा वसाहत (सोपाननगर) कमानीपासून पालखी तळापर्यंतदेखील दोन्ही बाजुंनी वाहने उभी केल्याने वारंवार वाहतूककोंडी होत आहे. पालखी महामार्ग ते कोंढवा हा सिमेंटचा रस्ता सासवड नगरपरिषद हद्दीत नव्याने झालेला असून दुतर्फा मनाला येईल तशी अस्ताव्यस्तपणे पार्किंग होत असल्यामुळे एवढा रुंद रस्तादेखील वाहतुकीस अपुरा पडत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचेच झाले आहे. परंतु वाहनचालकांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने वाहतूक व्यवस्थेला अडचणी येत आहेत.अद्ययावत मंडई असली, तरी भाजीविक्रेते बसतात रस्त्यावरशहरात अद्ययावत सोयींनीयुक्त महात्मा फुले भाजी मंडई उभारलेली असतानादेखील भाजीविक्रेते पालखी महामार्गावर, तसेच अत्रे सभागृहाजवळ बसलेले असतात. त्यामुळे सोपाननगरकडे जाणाऱ्या रहिवाशांना रस्त्यावर लावलेल्या वाहनांमधूनच वाट शोधावी लागते, यात किरकोळ अपघातही झालेले आहेत.सासवड शहरात दुचाकीस्वार सैराट अल्पवयीन मुले दुचाकी त्याचबरोबर चारचाकी वाहनेही दामटताना दिसत असून त्यांच्यावर ना पालकांचे नियंत्रण आहे, ना वाहतूक पोलिसांचा धाक. शहरात पे अँड पार्कची कोणतीही सोय उपलब्ध नाही. शहरात बुलेटची क्रेझ वाढलेली असून, भरधाव वेगात कर्क्कश आवाज काढत जाणारे बुलेटस्वार चौकाचौकांत पाहायला मिळत आहेत.
बेशिस्त वाहनचालक नागरिकांची डोकेदुखी
By admin | Published: July 07, 2017 2:58 AM