क्रीडा आणि गुन्हेगारी हा संयोग नवा अजिबातच नाही. ही खेळाडू मंडळी याच समाजाचे घटक आहेत. त्यामुळे भल्या-बुऱ्या प्रवृत्ती त्यांच्यातही असणारच. टायगर वुड्स (गोल्फ), माईक टायसन (बॉक्सिंग) या त्यांच्या खेळात निर्विवाद जगज्जेते असलेल्या खेळाडूंची कारकीर्द गुन्हेगारीनेच डागाळली. क्रिकेटमधल्या ‘इझी मनी’च्या मोहात अडकून हॅन्सी क्रोनिएसारखा चमकदार कर्णधार संपला. ‘मॅच फिक्सिंग’च्या संशयावरून कितीतरी क्रिकेटपटू, फुटबॉलपटू मैदानातून कायमचे बाहेर फेकले गेले. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या बळावर गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते की, गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच वापर करून कोणी क्रीडा क्षेत्रातील स्वत:चे स्थान मजबूत करते हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपल्याकडे कुस्तीतल्या अनेक मोठ्या स्पर्धांमधले ‘विजेतेपद’ कुस्ती होण्यापूर्वीच कसे निश्चित झालेले असते, पंच कसे विकले जातात याच्या अनेक ‘केसरी’ कहाण्या दबक्या आवाजात नेहमीच ऐकवल्या जातात. ‘स्टार खेळाडूं’चे ‘पदाधिकाऱ्यां’चे बिनबोभाट मांडलिकत्व न पत्करणाऱ्यांना खेळातून कसे संपवले जाते, याची कुजबूज नाही अशा क्रीडा संघटना दुर्मिळ आहेत. क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा संघटना यात राजकारणी, उद्योगपती, धनदांडगे यांची झालेली घुसखोरी खेळातला उमेदपणा, चुरस, शारीरिक कौशल्य यांना नख लावत नाही ना हेही पाहिले पाहिजे. खेळाला आणि खेळाडूंना आश्रय देणे आणि सगळेच पंखाखाली दाबूून घेणे यातला फरक या मंडळींनीही समजून घेतला पाहिजे. सुशीलने कुस्तीत मस्ती केली असेल तर ती जिरलीच पाहिजे, शिवाय या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या गुन्हेगारीवरही चर्चा झाली पाहिजे.
अग्रलेख : मस्ती जिरली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:08 AM