पुणे : जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील संवेदनशील भागात सुरक्षा प्रदान करण्यासह विविध राष्ट्रनिर्माण कार्यात प्रादेशिक सेना (टीए) आघाडीवर आहे. तर अग्निबाज विभाग दक्षिणेकडील शक्ती केंद्र आहे. सध्या या विभागाचे आधुनिकीकरण सुरू असून, भविष्यातील कोणत्याही परिस्थितीत शत्रूला चोख प्रत्त्युत्तर देण्याची क्षमता या विभागाची आहे, असे प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी केले.
पुण्यातील प्रादेशिक सेना मुख्यालय आणि अग्निबाज विभागाला भेट देत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी भेट देत लष्करी सज्जतेचा आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. सर्वप्रथम प्रादेशिक सेनेच्या मुख्यालयाला भेट देत त्यांनी मुख्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी प्रादेशिक सेना मुख्यालयाचे कमांडर ब्रिगेडिअर एम. एस. सिद्धू उपस्थित होते. त्यांनी नैन यांना मुख्यालयाच्या विविध कार्यकारी आणि प्रशासकीय बाबींची माहिती दिली. जनरल नैन म्हणाले, प्रादेशिक सेनेच्या तुकड्या या राजस्थान आणि महाराष्ट्रात वृक्षारोपण मोहिमा राबवत आहेत. रेल्वे आणि तेल क्षेत्रातही प्रादेशिक सेनेच्या तुकड्या कार्यरत आहेत. युद्धकाळात आघाडीवरील भागात रेल्वेगाड्या चालवण्याची आणि युद्धाच्या वेळी तेलाचा पुरवठा करण्याची जबाबदारी ते पार पाडतात.
त्यानंतर आर्मी कमांडर यांनी पुण्यातील अग्निबाज विभागाला भेट दिली. येथील सज्जतेचा व्यापक आढावा घेतला. या वेळी या विभागाचे प्रमुख मेजर जनरल अनूप जाखड, अग्निबाज विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग यांनी विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अग्निबाज विभाग दक्षिणेकडील शक्ती केंद्र आहे. त्यांनी यशस्वीपणे आधुनिकीकरणाच्या मार्गावर वाटचाल केली आहे. भविष्यातील कोणत्याही परिस्थितीत सामंजस्यपूर्ण आणि चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी इतर लढाऊ सज्जता महत्त्वाची आहे. देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी तिन्ही सेवादलांमध्ये सहकार्याच्या वातावरणात सज्जतेची तयारी कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी दोन्ही विभागांना केले.
फोटो : पुण्यातील प्रादेशिक सेना मुख्यालय आणि अग्निबाज विभागाला भेट देत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.