शेलपिंपळगाव : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या राबविले आहेत. ग्रामपंचायतीचे प्रत्येक पाऊल हे प्रगतीच्या दिशेने असले पाहिजे. मात्र विकासाबरोबरच गावातील नागरिकांचे आरोग्य हे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सरपंच उज्ज्वला गोकुळे यांनी केले.
चिंचोशी (ता. खेड) येथे ''राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान कार्यक्रमांर्तगत ''राष्ट्रीय पोषण माह'' साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपसरपंच माया निकम, ग्रामपंचायत सदस्या सीमा गोकुळे, कविता गोकुळे, मंगल शिंदे, अमोल कानडे, शिक्षिका मांजरे मॅडम, पाचारणे मॅडम, अंगणवाडी मदतनीस नजमा सैय्यद, आशावर्कर ललिता भोसकर, सोनाली गाडेकर, संजीवनी निकम, कर्मचारी सचिन चव्हाण, बाळासाहेब गोकुळे आदिंसह अन्य महिला उपस्थित होत्या.
दरम्यान पूरक पोषण आहाराचे प्रदर्शन आयोजित करुन गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर एक ते एकोणीस या वयोगटातील मुलामुलींना ''जंतनाशक'' गोळ्यांचे वाटप करण्यात आले. भविष्यात गावातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांची संपूर्ण तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच उज्ज्वला गोकुळे यांनी दिली.
फोटो ओळ : चिंचोशी (ता. खेड) येथे पोषण आहाराविषयी जनजागृती करताना उपक्रमार्थी महिला. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)