पुणे : राज्याच्या आरोग्य विभागाने २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी गट ‘क’ आणि ‘ड’ या संवर्गांतील विविध पदांच्या परीक्षा घेतल्या. मात्र, या परीक्षेत घोटाळा झाल्याचे (arogya bharti exam scam) उघडकीस आल्याने यात अनेकांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू आहे. एमपीएससी समन्वय समितीने आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची वारंवार मागणी केली आहे. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी केवळ परीक्षा रद्द करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी विधानसभेत दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
आरोग्य विभागाची २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली. त्यानंतर पेपर फुटल्याचे तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याबाबत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी तारांकित प्रश्न मांडत आरोग्य भरती परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये रद्द केली आहे का, याचा खुलासा करावा. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की या परीक्षेत पेपरफुटीची तक्रार दाखल झाल्याने काही जणांना अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याबाबत विचाराधीन आहे. लवकरच निर्णय घेऊ.
आरोग्यमंत्र्यांच्या या उत्तरावर एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे म्हणाले, की आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्याच्या तक्रारी आम्ही पुराव्यानिशी पुणे सायबर पोलिसांकडे दिल्या. त्यावरून सायबर पोलिसांनी चौकशी करत आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. अजूनही चौकशी सुरू आहे. या सर्व गोष्टींना सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही आरोग्यमंत्री निर्णय जाहीर करत नाही. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, म्हणून ते परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेत नाही, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. तसेच राजेश टोपे यांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.