पुणे : महाराष्ट्र कौन्सिलकडे नोंदणी न करता होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या लोहगाव परिसरातील बाेगस डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली. याप्रकरणी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधमोहिमेअंतर्गत महापालिकेतर्फे ही कारवाई केली आहे. काेणत्याही डॉक्टरने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतल्यावर त्याची नाेंद महाराष्ट्र कौन्सिलकडे करावी लागते. ती नोंदणी नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते.
बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणारे बाेगस डाॅक्टर, चुकीचे उपचार करणाऱ्या, अधिकृत नोंदणी नसणाऱ्या डॉक्टरांविरोधात नागरिक, संस्था महापालिकेकडे तक्रार करू शकतात. कागदपत्रांची शहानिशा करून तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळिवंत यांनी दिले आहे.