पुणे : जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांची ही वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कुठल्याही परिस्थीतीचा सामना करण्यासाठी १५ हजार ५७५ ऑक्सीजन खाटा, ३ हजार ३३७ अतिदक्षता विभागातील खाटा तर १ हजार ८२५ व्हेटीलेटर सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यात ही संख्या टप्याटप्याने वाढली आहे. गुरुवारी पुणे शहरात २९८, पिंपरी चिंचवडमध्ये ८०, नगर पालिका क्षेत्रात १०, कॅन्टोन्टमेंट परिसरात २० तर ग्रामीण भागात ६९ असे एकुण जिल्ह्यात ४७७ रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकुण २ हजार ५५६ सक्रीय कोरोना बाधित रुग्ण आहेत. ही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा धास्तावले असून खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ हजार ५७५ ऑक्सिजन खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर ३ हजार ३३७ अतिदक्षता विभागातील खाटा तर १ हजार ८२५ व्हेटीलेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
''ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी जिल्ह्यात जवळपास ३८ ऑक्सिजण निर्मितीचे प्लँट उभारण्यात आले आहेत. यातून रोज ११ हजार ८९ लीटर पर मिनिट ऑक्सिजनची निर्मित केला जात आहे. जवळपास ३ हजार रुग्णांना ४ लीटर पर मिनिट दराने या ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले. या सोबतच ४६४.८ मेट्रीक टन लिक्विड स्वरूपात ऑक्सीजन साठा करण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत ३६० मॅट्रीकटन ऑक्सिजनची मागणी होती. सध्याच्या घडीला दोन दिवस अतिरिक्त पुरवठा करता येईल येवढा साठा पुणे जिल्ह्यात उपलबद्ध असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.''