पुणे : आराेग्य विभागाकडून वारक-यांवर उपचार करण्यात येत आहेत. दि. 6 जून ते १० व ११ जूनपर्यंत देहू व आळंदी या ठिकाणी वारक-यांसाठी औषधोपचार सोय म्हणून 10-10 बूथ निर्माण करण्यात आले. शासकीय संस्थेमधून व निर्माण कैलेल्या बूथ व मेडिकल टीम कडून आत्तापर्यंत आळंदीत 11 हजार 896 व देहूंमध्ये 10 हजार 894 वारकऱ्यांना औषधोपचार करण्यात आलेला आहे. तसेच एकूण 56 वारकऱ्यांना अॅडमिट करून उपचार केले व 14 वारकऱ्यांना संदर्भ सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत.
देहू व आळंदी येथे प्रस्थानाच्या आधीच एक आठवडा पूर्वीपासून आरोग्य विभागामार्फत आळंदी देवस्थान व देहू देवस्थान या ठिकाणी किटकशास्त्रीय धूर फवारणी कार्यक्रम व पाणी नमुने तपासणी करण्याकरीता अतिरिक्त विशेष मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका तैनात केलेल्या आहेत. दोन्ही देवस्थानच्या ठिकाणी एकूण 1 हजार 851 हॉटेल्स व त्यामधील 6 हजार 853 कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. विहिरी, धर्मशाळा, नळाचे पाणी, हॅन्ड पंप, घरातील पाणी अशा ठिकाणचे एकूण 8 हजार 155 पाणी नमुने तपासणी करण्यात आली. दूषित पाण्याचे प्रक्रिया करून दुपार टेस्टिंग करण्यात आली. दोन्ही पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत फिरती वैदयकीय आरोग्य पथके तैनात करण्यात आलेली आहेत.
पालखीमार्गावर ७५ रुग्णवाहिका
अत्यावश्यक सेवेसाठी 24 तास रुग्णवाहिका पालखी मार्गावर तसेच पालखीसोबत कार्यरत आहेत. शिवाय पालखी सोहळ्या दरम्यान 108 च्या एकूण 75 रुग्णवाहिका तैनात आहेत. प्रत्येकी दोन किलोमीटर वरती एक आरोग्य पथक असे एकूण 127 आरोग्य पथके तयार केलेले आहेत. दिंडी प्रमुखांना एक हजार औषधांचे किट देण्यात आलेले आहे. त्यांना 156 टँकरद्वारे पाणीपुरवठा नियोजन केलेले आहे.
जनजागृतीसाठी पथनाट्ये
आरोग्य विषयक जनजागृतीसाठी खास तीन पथनाट्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण पालखी मार्गावर आरोग्य विषयी माहितीसाठी खास तीन चित्ररथांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पंढरपूर येथे दिनांक २८ ते २९ जूनदरम्यान दोन दिवसांमध्ये महाआरोग्य शिबिराचे नियाजन केलेले आहे.