नीलेश राऊत - पुणे : बंद पडलेले एक्स-रे मशीन दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च आहे व नवीन मशीन खरेदीसाठी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे केंद्र शासनाकडून टी़बी़ प्रोग्रॅमअंतर्गत मिळणारे एक्स-रे मशीन प्राप्त होताच शहरातील गरीब रुग्णांना मोफत एक्स-रे सेवा दिली जाईल, असे नियोजन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागास राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (टी़बी़ प्रोग्रॅम) केंद्र शासनाकडून मिळणारे एक्स-रे मशीन प्राप्त झाले असून, यासाठी आवश्यक गोष्टींची (डार्क रूम व तत्सम सुविधा) पूर्तता झाल्यावर ते येत्या दहा दिवसांत कार्यान्वित होईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, अद्यापही हे एक्स-रे मशीन केंद्राकडून रवानाच झाला नसल्याचे सांगण्यात आले.विशेष म्हणजे टी़बी़प्रोग्रॅममधील हे डिजिटल एक्स-रे मशीन केवळ छातीच्या एक्स-रेसाठी आहे. हे एक्स-रे मशीन ओ़पी़डी़साठी कामी येणार नाही असेही राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचा हा कारभार म्हणजे ‘आयाजीच्या जिवावर बायजी उदार’ असाच होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या गाडीखाना येथील दवाखान्यातील एक्स-रे मशीन गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. हे मशीन दुरुस्त करण्यासाठी दहा लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च असल्याने, पालिकेने नवीन मशीन खरेदी करण्याचा पर्याय निवडला. पण आर्थिक तरतूद नसताना एवढे महाग मशीन घेण्यापेक्षा टी़बी़प्रोग्रॅममधून मिळणाऱ्या मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात दीड वर्ष उलटले व शहरातील गरीब-गरजूंना पैसे खर्च करून एक्स-रे काढण्याची वेळ आली. याबाबत पालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कमला नेहरू रुग्णालयातील एक्स-रे मशीनद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र रुग्णाने दाखविल्यास मोफत एक्स-रे क्रस्रा लॅबोरेटरीकडून दिले जातील, असे सांगितले. याबाबतचे पत्र सदर लॅबोरेटरीला दिले असून, कमला नेहरूसह अन्य दोन ठिकाणी त्यांना पालिकेकडून चालविण्यास देण्यात आलेल्या एक्स-रे मशीनद्वारेही मोफत एक्स-रे यापुढे दिले जातील, असे सांगितले आहे.........पत्र का लावले नाही : विवेक वेलणकर शहरी गरीब योजनेद्वारे शहरातील हजारो गरिबांना खासगी हॉस्पिटलमध्ये एक लाखापर्यंत उपचार देणारा आरोग्य विभाग एक्स-रे मशीन सेवेबाबत गेल्या दीड वर्षापासून उदासीन का आहे. हे मशीन बंद पडल्यावर क्रस्रा लॅबोरेटरीला मोफत एक्स-रेसाठी पत्र दिले होते, तर तशी जाहीर सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीखाना येथे का लावली नाही? असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. ............बंद पडलेल्या एक्स-रे मशीनचा दुरुस्ती खर्च जास्त असल्याने, नवीन मशीन घेण्याऐवजी टी़ बी़ प्रोग्रॅमअंतर्गत मिळणाऱ्या एक्स-रे मशीनचा वापर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. येत्या आठ-दहा दिवसांत हे मशीन कार्यान्वित होऊन गरीब रुग्णांना मोफत एक्स-रे प्राप्त होतील - डॉ. रामचंद्र हंकारे़, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.
पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचा हा कारभार म्हणजे 'आयजीच्या जिवावर बायजी उदार'...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 11:39 AM
दीड वर्ष उलटले व शहरातील गरीब-गरजूंना पैसे खर्च करून एक्स-रे काढण्याची वेळ
ठळक मुद्देपालिकेच्या गाडीखाना येथील दवाखान्यातील एक्स-रे मशीन गेल्या दीड वर्षापासून बंदशासनाकडून येणाऱ्या मशीनवर आरोग्य विभागाचे नियोजन