विशाल शिर्के पुणे : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना अचानक बंद केल्याने दिव्यांग हवालदिल झाले आहेत. अनेकांनी नियमाप्रमाणे पैसे भरूनही त्यांना संबंधित कंपनीकडून विमा देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने विमा रकमेचा वाटा न दिल्याने ही योजना बारगळल्याचे सांगण्यात येत आहे.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने २ आॅक्टोबर २०१५पासून दिव्यांगांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. अंधत्व, क्षीण दृष्टी, लेप्रसी, बहिरेपणा, कमी ऐकू येणे, मानसिक आजार असे विविध अपंगत्व असलेल्या शून्य ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना याचा लाभ घेता येणार होता. ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असेल, त्यांना ३५५ रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येईल अशी अट त्यात घालण्यात आली. विमा हप्त्यापैकी ९० टक्के वाटा हा केंद्र सरकारकडून उचलण्यात येणार आहे.या विमा योजनेअंतर्गत वार्षिक २ लाख रुपयांचे संरक्षण कुटुंबाला मिळण्याची सोय झाली होती. मात्र, एप्रिल २०१७पासून अचानकपणे या विमा सेवेसाठी पैसे भरूनदेखील कोणतीच कागदपत्रे विमा कंपनीकडून उपलब्ध होत नाहीत.अखेर पुण्यातील ४० दिव्यांगांनी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या राजेंद्र वाकचौरे आणि दत्तात्रय भोसले यांच्यामार्फत देशाच्या अपंग कल्याण आयुक्तांना लेखी तक्रार केली. त्यात विमा योजना राबविणाºया न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडे पैसे भरूनदेखील विमा कार्ड मिळत नसल्याचे म्हटले आहे.
आरोग्य विमा योजना बारगळली; केंद्र सरकारने हिस्साच भरला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:37 AM