- गौरव कदम - सहकारनगर : पुणे महानगरपालिकेच्या कात्रज, धनकवडी, सहकारनगर, बालाजीनगर, बिबवेवाडी भागातील नागरिकांनी रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यामध्ये हात घालून सफाई कामगारांना कचरा वर्गीकरण करावे लागत आहे. हे अशा प्रकारचे दृश्य कचरा पडलेल्या ठिकाणी दिसून येत आहे. कामगारांच्या हातामध्ये हातमोजे, पायात गमबूट, तोंडाला मास्क अशा प्रकारची प्रावरणे दिसत नाही. प्रावरणाशिवाय कचऱ्याचे वर्गीकरण करत असलेले सफाई कामगार दिसत आहे. यामुळे सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला जबाबदार कोण? पुणे महानगरपालिकेचे प्रशासन की कचरा टाकणारे नागरिक? नक्की कोण ? सन २००६ साली उच्च न्यायालयाने कचरा वर्गीकरणाच्या संदर्भात निकाल दिलेला आहे की, जो नागरिक कचरा निर्माण करतो त्याच नागरिकांनी कचरा वर्गीकरण करणे व विल्हेवाट लावणे हे बंधनकारक आहे. तसेच, जर नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही आणि विल्हेवाट लावली नाही, तर प्रशासनाने अशा नागरिकांवर कारवाई करावी. असे उच्च न्यायालयाने आदेश देऊनदेखील मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात नाही. प्रशासनामार्फत स्वच्छतेच्या कारवाया केल्या जातात; पण कारवायांमध्ये सातत्य नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामध्ये सफाई कामगारांना हात घालावे लागत आहे. कचरा हाताने वर्गीकरण केल्यामुळे सफाई कामगारांच्या हाताला पायाला जखमा व खरूज होणे व खाज सुटणे तसेच घाणीच्या वासामुळे श्वसनाचे विकार जडले आहेत. त्यामुळे वयाच्या ४५ ते ५५ व्या वर्षीच सफाई कामगारांच्या मृत्यूचे प्रमाण ८०% ते ९०% टक्के दिसून येते. ............काही सफाई कामगारांशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर, ‘आमचे वरचे अधिकारीच आम्हाला कचऱ्यामध्ये हात घालाय लावत्यात आणि कचरा वेगळा करायला लावत्यात बघा. कचरा वेगळा नाही केला तर नोकरीवरून घरी बसवण्याची धमकीबी देत्यात बघा. कित्येक ठेकेदाराच्या कामगारांना तर कामावरून कमी केले बघा. जगावं का मरावं आसं झालंय बघा!’ असे त्यांनी सांगितले.......
आमचा समाज एक तर दलित हाय बघा, नाईलाज हाय आमचा, काय करावं? तेच कळत न्हाय, पोरंबाळं कसं जगवावं हे आमच्यासमोर पडलेलं लयी मोठं कोडं हाय!’ अशा हृदयस्पर्शी कहाण्या सफाई कामगारांकडून ऐकायला मिळाल्या आहेत.
.................. अशाप्रकारे सफाई कामगारांना घाणीत हात घालून कचºयाचे वर्गीकरण करायला सक्ती करायला लावणाºया व सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आणणाºया अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सफाई कामगार करत आहेत.