पुणे : उमलत्या वयात मुलींना अनेक शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागत असल्याने पालक, मार्गदर्शक आणि शिक्षकांना या टप्प्याची माहिती व्हावी यासाठी निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्टने किशोरी आरोग्य कोश निर्मित केला आहे. परंतु खेडोपाड्यातील शाळांपर्यंत हा कोश पोहोचविला जाईल या या कोशाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी दिलेल्या आश्वासनाचा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनाच विसर पडला आहे. कोशाचे निर्मितीकार या आश्वासनाच्या पूर्ततेकडे डोळे लावून बसले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलींमध्ये नैसर्गिक काळापूर्वीच झपाट्याने मानसिक आणि शारीरिक बदल होताना दिसत आहेत. हीच किशोरवयीन मुलगी उद्याची माता होणार असल्याने तिचे आरोग्य सदृढ राखले तर राष्ट्राचे आरोग्य उत्तम राहाणार आहे. याच भूमिकेतून ट्रस्ट आणि डिंपल प्रकाशनने पहिल्यांदाच ‘किशोरी आरोग्य कोशा’ची निर्मिती केली आहे. किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आणि शारीरिक होणा-या महत्वपूर्ण बदलांची माहिती पालकांबरोबरच शिक्षकांनाही होणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी हा कोश खेडोपाड्यांच्या शाळांमध्ये पोहोचणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे शाळांमध्ये या कोशाचे वाटप केले जावे असा प्रस्ताव कोशाच्या संपादिका आणि विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी आरोग्यमंत्र्यांना सादर केला होता. या कोशाच्या प्रकाशन समारंभात आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी या कोशाचे कौतुक करून खेडोपाड्यातील शाळांमध्ये हा कोश पोहोचविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी आश्वासनांची पूर्तता अद्याप झाली नसल्याचे डॉ. विजया वाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
येत्या एप्रिलपर्यंत किशोरी आरोग्य कोशाचे संकेतस्थळ पूर्णत्वासकिशोरी आरोग्य कोशाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे जगभरातील लाखो लोकांपर्यंत हा कोश पोहोचविण्याच्या हेतूने किशोरी आरोग्य कोशाचे संकेतस्थळ तयार केले जात आहे. या कोशामध्ये विविध विषयांवर लेख लिहिलेल्या प्रत्येक डॉक्टरांचे श्राव्य स्वरूपात विचार ऐकता येणार आहेत. प्रगती बाणखेले आणि सुखदा चित्रे या दोघींनी प्रत्येक डॉक्टरांची ओळख करून दिली आहे. जगभरामध्ये संकेतस्थळाच्या माध्यमातून घरोघरी हा कोश पोहोचविला जाणार आहे. हे संकेतस्थळ येत्या एप्रिलपर्यंत पूर्णत्वास येणार असल्याची माहिती डॉ. विजया वाड यांनी दिली.