पुणे : पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या डोके वर काढत असतात. ढगाळ हवामान, हवेतील आर्द्रता यांमुळे हाडांशी संबंधित समस्या आणि मूत्रपिंडाचे आजारही उद्भवतात. बहुतेक लोकांना सांधेदुखी, स्नायू ताठरणे आणि दुखापतीचा सामना करावा लागतो. मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएट्रायटिस, हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई यांसारखे आजारही होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.
मुलांना द्या फ्लूची लस
मुलांना वर्षभरच फ्लू होण्याचा धोका असतो. हिवाळा आणि पावसाळ्यात हा धोका अधिकच असतो. लस घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होण्यासाठी साधारण २ आठवड्यांचा वेळ लागू शकतो. त्यामुळेच, पावसाळा किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीलाच लस घ्यायला हवी. पाच वर्षांखालील मुलांमध्ये फ्लूमुळे गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका अधिक असतो. शिवाय, त्यांच्यामुळे इतरांनाही लागण होऊ शकते. त्यामुळे मुलांना पावसाळ्यात फ्लूची लस देऊन घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
वैयक्तिक स्वच्छता ठेवणे फार गरजेचे
तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यातून विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. संभाव्य आजाराचा धाेका टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवणे फार गरजेचे असते. स्वच्छता न बाळगण्यास मूत्रपिंडासंबंधी विकार होऊ शकतात. वेळीच निदान व उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या, वेळेवर औषधे घ्या, भरपूर हंगामी फळे खा आणि लघवी जास्त काळ रोखून ठेवू नका असे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजन कोठारी यांनी सांगितले आहे.
दुखणे कमी करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करा
सांधेदुखीवर मात करण्यासाठी आपल्या क्षमतेएवढाच व्यायाम करा. नियमित शारीरिक हालचालींमुळे सांधेदुखी कमी होऊ शकते. पौष्टिक अन्नाचे सेवन करा. मसालेदार, तेलकट आणि हवाबंद डब्यांतील पदार्थ टाळा. सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करा असे डॉ. आशिष सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.