पुणे : जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा पंचनामा आज जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला. डॉक्टर नसतात, नर्सच डॉक्टरचे काम करतात, हलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीव जातोय अशा तक्रारी करीत सदस्यांनी ठराव करा व शासनाच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना द्या, अशी मागणी लावून धरली.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे इंदापूरच्या ग्रामीण रुग्णालयात एका महिलेला दुसऱ्याचा एचआयव्ही पॉझिटीव्हचा रिपोर्ट देण्यात आला. ती महिला गरोदर असल्याने पुढे तिच्यासह तिच्या बाळाचा प्रश्न गंभीर झाला होता... हा प्रश्न ऋतुजा पाटील व श्रीमंत ढाले यांनी उपस्थित केला आणि सर्वच तालुक्यांतील सदस्यांनी आरोग्यसेवेच्या तक्रारी मांडल्या. हे केवळ इंदापुरातच होतेय असे नाही, तर सर्वच तालुक्यांत हे घडतेय असे सांगूत जुन्नरच्या सदस्यांनी सर्पदंशाच्या तीन केस येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावल्याचे सांगितले. रुग्ण ग्रामीण रुग्णालयात जातो तेव्हा तेथे डॉक्टर नसतात, नर्स असतात. अॅम्ब्युलन्सची सुविधा नसते, व्हेंटिलेटर नसते, शासनाने ज्या सुविधा पुरविल्या आहेत, त्या तरी तेथे मिळाव्यात, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. यावर हा विषय गंभीर आहे; त्यामुळे संबंधितांना बोलावून याबाबत चर्चा करू, असे सांगितले. त्यानंतर, आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी उपस्थित केला. याला सर्वच तालुक्यांतील सदस्यांनी पाठिंबा देत ही मागणी पुढे रेटली. यानंतर अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांना माहिती घ्या, अशी सूचना केली. आजच्या बैैठकीत गावठाण मोजणीला सर्वच सदस्यांनी पाठिंबा देत ठरावाला मंजुरी दिली. पेपरफुटीमुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली असल्याचे बुचके यांनी सांगितले. संबंधितांवर काय कारवाई केली याची माहिती द्या, अशी मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन करून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली असून, समन्वयकाचेही निलंबन केल्याचे सांगितले. दशरथ काळभोर यांनी जिल्हा परिषद कमचाऱ्यांना मेडिक्लेमची बिले का मिळत नाहीत, असा प्रश्न विचारला. निधी नसल्याने काही बिले बाकी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नारायणगाव ग्रामपंचायत बरखास्तीचे काय?सभेत नारायणगाव ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईचा मुद्दाही उपस्थित झाला. या वेळी ग्रामपंचायत बरखास्तीचे काय? असे आशा बुचके यांनी विचारले. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. ते काय सूचना करतात त्यावर अवलंबून असून, त्यांनाच अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.पाणी अडवाभोर, वेल्हा व मुळशी या तालुक्यांत सर्वांत जास्त धरणे आहेत; पण यंदा आताच्या परिस्थितीत धरणात ५० टक्केही पाणी नाही. बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यात पाणी अडून राहत नाही. पाणी खाली चालले आहे. तरी आमच्या दुर्गम भागाकडे जरा लक्ष देऊन निदान या बंधाऱ्यांचे पाणी तरी अडवा, अशी मागणी कुलदीप कोंडे यांनी केली.
जिल्हा रुग्णालयांत आरोग्य सेवांची बोंब
By admin | Published: December 04, 2015 2:39 AM