लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रातला कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्चला पुण्यात सापडला. तीन महिन्यांतच पुणे हा कोरोनाचा देशातला ‘हॉटस्पॉट’ बनला. कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य यंत्रणेतील त्रुटी उघड्या पडल्या. सरकारी रुग्णालयांमधील तोकडे मनुष्यबळ, संसाधनांचा अपुरा पुरवठा, रुग्णांची ससेहोलपट, खाजगी रुग्णालयांनी केलेली लूट अशा गंभीर समस्यांचा कोरोना काळात सामना करावा लागला. प्लेग, सार्स, स्वाईन फ्लूपेक्षाही शहरासाठी कोरोना सर्वाधिक घातक ठरला.
आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा
महानगरपालिकेतर्फे एकूण अंदाजपत्रकाच्या ५ टक्के तरतूद आरोग्य यंत्रणेसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, पुरेशी तरतूद होत नसल्याने आरोग्य यंत्रणेचे कोरोना काळात अक्षरश: तीन तेरा वाजले. स्वाईन फ्लूच्या साथीतून आरोग्य यंत्रणेने काहीच धडा घेतला नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली. शहरामध्ये ४८ बाह्यरुग्णविभाग, १९ प्रसुतीगृहे, १ सर्वसाधारण रुग्णालय आणि १ साथरोग रुग्णालय आहे. याशिवाय, ससून हे राज्य सरकारचे रुग्णालयही आहे. ४० लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी एकच साथरोग रुग्णालय असून त्यातही अपुऱ्या सुविधा असल्याचे पहायला मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर सुरुवातीला केवळ नायडू रुग्णालयातच रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर ससून हॉस्पिटल, महानगरपालिकेची रुग्णालये यांचाही कोव्हिड रुग्णालयांमध्ये समावेश झाला. मात्र, रुग्णालयांमधील अपुऱ्या सुविधा, रिक्त पदे, पीपीई किट, मास्क, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावे लागले. स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन कोव्हिड केअर सेंटर उभी केली. स्वयंसेवी संस्था पुढे आल्या नसता तर सरकारी यंत्रणेची आणखी काय धांदल उडाली असती, याची कल्पना न करणेच बरे. खाजगी रुग्णालयांशी महापालिकेने करार केला खरा; मात्र, अवाजवी बिलांमधून खाजगी रुग्णालयांनी अक्षरश: लूट केली. जुलै ते सप्टेंबर या काळात कोरोना रुग्णांना बेडही मिळत नव्हते. कोरोनानंतरही रुग्णांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यावर पोस्ट कोव्हिड ओपीडीही सुरु करण्यात आल्या.
ससूनमध्ये सर्वाधिक मृत्यूदर
ससून सर्वोपचार रुग्णालयातही अपु-या मनुष्यबळाअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. सुरुवातीला संपूर्ण देशात ससून सर्वोपचार रुग्णालयातील मृत्यूदर सर्वाधिक होता. त्यातच ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली राज्यातील चर्चेचा विषय ठरली. वाढती रुग्णसंख्या पाहता ससूनची स्वतंत्र इमारती कोव्हिड उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आली.