लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मोठ्या प्रमाणात आतापासून तयारी केली जात आहे. जिल्ह्यात या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयांना सक्षम केले जाणार आहे. लहान मुलांवर या लाटेत जास्त धोका असल्याने त्यांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुका स्तरावर लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तसेच बालरोग तज्ज्ञांची भरती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. या सोबतच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही. त्यात वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तवले आहे. तसेच ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त गंभीर असेही सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी तसेच या लाटेला सामोरे जाण्यासाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे. या लाटेचा संभाव्य विचार केल्यास गतिशील आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, जनरल प्रॅक्टिशनर्स, फिजिओथेरेपिस्ट, मानसोपचारतज्ञ आदींची भरती केली जाणार आहे. तसेच त्यांना त्यादृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ससून रुग्णालयामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लहान मुलांचा होणारा संभाव्य धोका बघता जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोग तज्ज्ञांची पदे भरली जाणार आहे. जिल्हा परिषेदेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात देशभरातून बालरोग तज्ज्ञांचे अर्ज आले आहेत. त्यांचे अर्ज बाजूला काढण्यात आले असून तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता त्यांची भरती केली जाणार आहे.
तिसऱ्या लाटेत सरकारी रुग्णालयासोबतच खासगी दवाखान्यांनाही प्राधान्य दिले जाणार असून, या रुग्णालयाच्या माध्यमातून या लाटेची तीव्रता कमी केली जाणार आहे. सर्वाधिक भर हा प्राथमिक आरोग्य केंद्रावर असणार आहे. प्राथमिक आरोग्य आणखी सक्षम केली जाणार आहे. लहान मुलांसाठी या केंद्रात खाटा राखीव ठेवल्या जाणार आहे. ग्रामीण भागातच त्यांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी तालुका स्तरावरच मुलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाची तयारी ठेवली जाणार आहे.
चौकट
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर खाटांची संख्या कमी पडली होती. अनेकांना बेड न मिळाल्यामुळे त्यांची गैरसोय झाली हाेती. मात्र, तिसऱ्या लाटेचा विचार करता सामाजिक संस्थांकडून व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सामाजिक संस्थांशी बोलून तयारी सुरू करण्यात आली आहे.