पुणे : घरबसल्या आरोग्य सल्ला मिळणाऱ्या ई-संजीवनी ओपीडीत आता आयुर्वेदिक सल्लाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपासून सेवेला प्रारंभ झाला असून, सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील १५०-२०० डॉक्टर, तर जिल्ह्यातील ३० ते ४० आयुर्वेदिक डॉक्टर या ओपीडीशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला प्राचीन काळापासून महत्त्व आहे. कोरोनाकाळात आयुर्वेदाने महत्त्व नव्याने अधोरेखित झाले. त्यामुळे ई-संजीवनी ओपीडीमध्ये आता आयुर्वेदिक डॉक्टरांचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेलिकन्सलटेशनद्वारे आॅनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे. याद्वारे सर्वसामान्यांना मोफत आॅनलाइन उपचार मिळत आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ई-संजीवनी योजनेंतर्गत रुग्णांना बसल्या जागी डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. यामध्ये दोन आठवड्यांपूर्वीपासून आयुर्वेदिक डॉक्टरांशी रुग्णांना संवाद साधता येणे शक्य झाले आहे. आॅनलाइन ओपीडीची सुविधा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध करून देण्यात आली असून, राज्यभरातील ३०० हून अधिक डॉक्टरांशी रुग्ण याद्वारे संपर्क साधू शकतात. यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वेबसाइट किंवा अॅपवर करा नोंदणी
गुगल क्रोमला ‘ई-संजीवनी ओपीडी’ असे टाईप केल्यास डॅशबोर्ड सुरू होते. त्यामध्ये पेशंट प्रोफाईल या पर्यायावर क्लिक केल्यावर रुग्णाची माहिती भरायची असते. सर्व माहिती भरल्यावर रुग्णाच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो. ओटीपी टाकल्यावर टोकन क्रमांक मिळतो. टोकन क्रमांक पेशंट प्रोफाइलमध्ये भरायचा असतो. त्यानंतर आजाराची माहिती, तक्रार याबद्दल माहिती भरल्यावर आपल्या गरजेप्रमाणे राज्यभरातून डॉक्टरांशी संपर्क साधता येतो. त्यांच्याशी कॉलवर बोलून, समस्येवर चर्चा करून औैषधे दिली जातात.