पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या दर्जेदार कामाची पावती मिळत असून जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन जाहीर झाले आहे. देशात पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून फक्त गुजरातमधील ६ आरोग्य केंद्रांना हा दर्जा मिळाला आहे.गेल्या वर्षी सांगवी, मोरगाव, काटेवाडी, कुरकुंभ, खामगाव, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोली, वाडेबोल्हाई, कुंजीरवाडी, निमगावसावा, सावरगाव, राजुरी, शेलपिंपळगाव, आंबोली, डेहणे, करंजविहीरे,कामशेत, टाकवे, माण, बेलसर, रांजणगाव, करडे, टाकळीहाजी, करंजावण या केंद्रांनी अर्ज केले होते. यापैकी १३ केंद्रांची नुकतीच तपासणी झाली होती. त्यातील लोणी काळभोर व माण या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना यापूर्वी हे मानांकन मिळाले होते. तपासणी समितीने इतर केंद्रांना काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्या पूर्ण करण्यात आणखी ९ आरोग्य केंद्रांना यश आले आहे. यात काठेवाडी, सांगवी, कुरकुंभ, खामगाव, वाघोली, उरुळी कांचन, शेळपिंपळगाव, मोरगाव व खडकवासला या केंद्रांचा समावेश असून त्यांनाही राष्ट्रीय मानांकन जाहीर झाले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ११ आरोग्य केंद्रे या स्पर्धेत यशस्वी झाली असून त्यानंतर गुजरातचा नंबर लागतो. त्यांच्या सहा केंद्रांना हा दर्जा मिळाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड झाल्याचे पत्र राष्ट्रीय आरोग्य मानांकन समितीच्या उपउपसंचालक दीप्ती मोहन यांनी कळविले असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी भगवान पवार यांनी सांगितले.पायाभूत सुविधा, मुनष्यबळ, वैद्यकीय सेवा गुणवत्तेच्या आहेत का? कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे का? आणि दिलेली उद्दिष्टे पूर्ण केली आहेत का? या निकषांच्या आधारे दोन तपासण्या होतात. पहिल्या तपासणीत काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याची संधी असते. दुसऱ्या तपासणीनंतर निवड केली जाते.आणखी २५ केंद्रांची तयारीजिल्ह्यातील आणखी २५ आरोग्य केंद्रे या स्पर्धेत टिकू शकतील, या दर्जाची असून त्यांची तयारी सुरू आहे. यात हवेलीतील खानापूर, खेडशिवापूर, फुरसुंगी, भोरमधील आंबवडे, वेल्हेतील पासली, मुळशीतील मुठा, मावळमधील कार्ला, जुन्नरमधील मढ, आपटाळे, आळे, खेडमधील कडूस, वाडा, पाईट, आंबेगावमधील म्हाळुंगे पडवळ, डिंभा, पेठ, बारामती डोर्लेवाडी, होळ, इंदापूर लासुर्णे, पळसदेव, बिजवडी, पुरंदरमधील वाल्हा, शिरूरमधील केंदूर व दौैंडमधील देऊळगावराजे, राहू या केंद्रांचा समावेश आहे.
गुजरातपेक्षाही जिल्ह्यातील आरोग्यसेवा दर्जेदार
By admin | Published: September 17, 2016 1:22 AM