- भालचंद्र पोळ ( पुणे)
आपल्या शरीराच्या पोषणासाठी वनस्पतींचा उपयोग होतो. जगात सर्व शक्ती सूर्यापासून मिळते. सूर्याचे ऊन पिऊनच वनस्पती वाढतात. त्या वनस्पती, धान्य, फळे माणूस सेवन करतो. याचा अर्थ आपण अप्रत्यक्षपणे सूर्याच्या शक्तीला पितो असेच म्हणावे लागेल.
पीक संरक्षणासाठी विविध मार्ग आहेत. त्यापैकी प्रमुख पाच पद्धती आहेत, त्या पुढीलप्रमाणे :
१) रासायनिक पद्धती- सध्याच्या प्रचलित पद्धतीत विषारी रासायनिक औषधांचा वापर पिकावरील किडी व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला जातो; मात्र या औषधांचा बराचसा अंश माणसाच्या रोजच्या आहारात उतरत आहे. यामुळे कॅन्सर, रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह आदी आजारांना निमंत्रण मिळत आहे.
२) वनौषधी पद्धती- वनौषधी म्हणजे वनस्पतीच्या अर्कापासून बनविलेली औषधे. याचा उपयोग पिकांवरील रोग व किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला जातो. अनेक कंपन्यांनी वनौषधींपासून बनविलेल्या औषधी बाजारात आणलेल्या आहेत. याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही. मित्रकिडींना या औषधांमुळे कोणतेही नुकसान होत नाही.
३) जैविक पद्धती- या पद्धतीत विविध जैविक बुरशी व जीवाणूद्वारे बुरशीजन्य रोग व विविध प्रकारचे रोग, किडी नियंत्रित करता येतात.
४) फिजिकल पद्धती- या पद्धतीत फेरोमन सापळे, कामगंध सापळे, लाईट ट्रॅप आदींचा वापर करून किडींचे नियंत्रण केले जाते.
५) आहार- या पद्धतीत मानव किंवा वनस्पती यांना पोषण आहार मिळाला तर कोणीही रोगाला बळी पडणार नाही. निरोगी पीक जन्माला येण्यासाठी जमिनीचे आरोग्य जपणे, पिकांची पद्धती, पाण्याचे नियोजन या सर्व गोष्टी सांभाळल्या तर, पिकांची प्रतिकारशक्ती वाढून पीक रोगाला बळी पडत नाही.