कोरेगाव मूळ : सध्या लग्नसराईचा ‘हंगाम’ सुरू असून जेवणावळीत प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लास या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. जेवणावळी आटोपल्यानंतर कचऱ्यात फेकलेल्या या उष्ट्या पत्रावळ्या खाताना मोकाट जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पत्रावळ्या जात असल्याने अनेक जनावरांना पचनसंस्थेचे आजार होत आहे. अनेकदा मृत्यूही ओढवत आहे. पूर्वी लग्नकार्यासह इतर कार्यक्रमातही जेवणावळी देताना पळस, वड, मोहाच्या झाडाच्या पानांचा पत्रावळी, द्रोण तयार करण्यासाठी उपयोग होत होता. या पत्रावळी, द्रोण नाशवंत असल्याने त्या नष्ट होत होत्या. गुरांनी त्या खाल्ल्या तरी त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत नव्हता. काही वर्षांपासून मात्र लग्नसोहळे आणि इतर कार्यक्रमांमध्ये विविध झाडांच्या पानांपासून बनविण्यात आलेल्या पत्रावळी आणि द्रोणांचा वापर करणे जवळपास बंद झाले आहे. त्या पत्रावळी आणि द्रोणांची जागा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या आणि द्रोणांनी घेतली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही लग्नकार्यासह इतर कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येत आहे.कार्यक्रमांमध्ये झालेल्या जेवणावळीनंतर प्लॅस्टिकच्या उष्ट्या पत्रावळ्या, द्रोण आणि प्लॅस्टिकचे ग्लास उघड्यावर कोठेही फेकले जातात. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी कोणाकडूनही प्रयत्न केले जात नाहीत. या फेकण्यात आलेल्या पत्रावळ्या मोकाट जनावरांद्वारे अन्न खाताना खाल्ल्या जातात. पत्रावळ्या व द्रोणांच्या माध्यमातून प्लॅस्टिक खाण्यात आल्याने गुरांच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होत होतो. विशेषत: गायी-म्हशींचा यामुळे गर्भपात होत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते. यासोबत जनावरांच्या यकृतावर आणि शरीरातील विविध अवयवांवरही गंभीर परिणाम होत आहे. (वार्ताहर)
प्लॅस्टिक पत्रावळींमुळे आरोग्य धोक्यात
By admin | Published: April 28, 2017 5:48 AM