पुणे : प्रवाशांच्या तक्रारी, अडचणीं ऐकून घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुन्हा प्रवासी दिनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यापूर्वी अनेकदा प्रवासी दिनाला सुरूवात करून काही दिवसांतच बंद करण्याची परंपरा आहे. त्यामुळे ‘दीन’ प्रवाशांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रशासन किती दिवस तत्परता दाखवणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.‘पीएमपी’चा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष आहे. प्रवासी, सर्वसामान्य नागरिक या कक्षाकडे दुरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन तक्रार करता येते. तसेच ई-कनेक्ट अॅपवरही तक्रार करण्याची सुविधा आहे. पण अनेक प्रवासी तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना आलेल्या अडचणींबाबत पीएमपीकडे दाद मागत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक आगारामध्ये प्रवासी दिनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवस प्रमुख बसस्थानकांमध्ये प्रवासी दिन घेण्यात येत होता. त्यासाठी ठिकठिकाणी वरिष्ठ अधिकाºयांची नेमणुकही करण्यात आली होती. प्रवाशांनी सांगितलेल्या अडचणी व तक्रारी नोंदवून घेत त्याचे तातडीने निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश होता. या सर्व तक्रारींची काही प्रमाणात दखलही घेतली जायची. पण यामध्ये कधीच सातत्य राहिले नाही.नवीन अधिकारी आल्यानंतर या दिनाची येत होती. त्यानुसार काही दिवस प्रवाशांना मान मिळायचा. पण ‘नव्याचे नऊ दिवस’ याप्रमाणे प्रवासी पुन्हा दीन होतात, हे आतापर्यंत घडत आले आहे. आता प्रशासनाने जून महिन्यापासून पहिल्या शनिवारी पुन्हा प्रवासी दिनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आगार प्रमुखांच्या कार्यालयात प्रवाशांच्या तक्रारी, सुचना ऐकून घेतल्या जाणार आहेत. दर महिन्याला यादिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत प्रवाशांना थेट अधिकाऱ्यांना भेटता येईल. बस, मार्ग, चालक, वाहक, कंट्रोलर, चेकर, मेकॅनिक यांसह कोणत्याही बाबतीत तक्रारी तसेच सुचना करता येतील. या तक्रारींवर तात्काळ चौकशी व कारवाई होणार आहे. तसेच तक्रारींची दखल घेऊन मध्यवर्ती कार्यालयाकडून त्याचा निपटारा केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवाशांच्या तक्रारी, अडचणीं ऐकून घेण्यासाठी पीएमपीकडून पुन्हा '' प्रवासी दिना'' ला साद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:52 PM
यापूर्वी अनेकदा प्रवासी दिनाला सुरूवात करून काही दिवसांतच बंद करण्याची परंपरा आहे.
ठळक मुद्देपीएमपीकडून आयोजन : ई-कनेक्ट अॅपवरही तक्रार करण्याची सुविधा ‘दीन’ प्रवाशांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रशासन किती दिवस तत्परता दाखवणार हा प्रश्न दर महिन्याला यादिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत प्रवाशांना थेट अधिकाऱ्यांना भेटता येईलबस, मार्ग, चालक, वाहक, चेकर,यांसह कोणत्याही बाबतीत तक्रारी तसेच सुचना करता येणार