पुणे : लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित टिळक यांचा अंतरिम जामीन रद्द करण्याच्या अर्जावर ८ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.संबंधित महिलेने (रा. पौड रस्ता, कोथरूड) यासंदर्भात रोहित टिळक यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केले. लग्नाचा विषय काढल्यानंतर प्रत्यक्षात व फोनवरून शिवीगाळ केली. मारहाणही केली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी रोहित टिळक यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांचा अंतरिम जामीन रद्द करावा, अशी मागणी संबंधित महिलेने न्यायालयात केली आहे.याप्रकरणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महिलेतर्फे अॅड. बी. ए. अलूर काम पाहत असून त्यांनी टिळक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. टिळक यांच्यातर्फे अॅड. नंदू फडके यांनी काम पाहिले. संबंधित महिलेने टिळक यांच्याविरुद्ध खोटी केस केली आहे. आम्ही पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यामुळे कस्टोडीयला इंट्रॉगेशनची आवश्यकता नाही. वैद्यकीय तपासणीस तयार असून पुराव्यात हस्तक्षेप करणार नाही, असे अॅड. फडके यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर याप्रकरणी ८ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
रोहित टिळक यांच्या अर्जावर ८ आॅगस्टला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:30 AM