कळस : खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्याची सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये कालव्यावरील अवलंबून असलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर शेतीला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली.भादलवाडी (ता. इंदापूर) येथील विविध विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, कळसचे सरपंच गणेश सांगळे, डॉ. संजीव लोंढे, बबन खारतोडे, पोलीस पाटील तुकाराम खाडे, तानाजी सांगळे, संदीप वायाळ, दत्तात्रय कन्हेरकर, प्रवीण कन्हेरकर, ज्ञानदेव कन्हेरकर, नाथाभाऊ कुतवळ, बापू भांडवलकर उपस्थित होते. खडकवासला कालव्यावरून पुणे शहराला नेहमीच अतिरिक्त पाणी दिले जात आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सिंचन अडचणीत आले आहे.गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी आवर्तन दिले जात नाही, त्यामुळे या भागातील पिके जळून गेल्याने मोठे नुकसान झाले होते, ही परिस्थिती कायम असल्याने प्रशासकीय पातळीवर न्याय मागण्याचा प्रयत्न केला; मात्र शहरी भागाला प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील सिंचनावर अन्याय करण्यात आला.पुणे शहराचा पाणीवापर व मागणी वाढतच चालली असल्याने इंदापूर तालुक्यातील व दौंड,हवेली, बारामती या भागातील फळबागा व शेती अडचणीत आली आहे, त्यामुळे न्यायहक्क मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे यावर दोनदा सुनावणी झाली असून १३ मार्च रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे पाटील यांनी सांगितले.
सिंचनासाठी सुनावणी १३ मार्च रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 2:25 AM