पुणे : तीन व्यवसायाशी संबंधित दाव्यांची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू केली आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग पुण्यात सुरू झाला आहे. मुंबईत दाखल असलेले आठ दावे शुक्रवारी सुनावणीसाठी ठेवले.महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी (महारेरा) कडे बांधकाम व्यवसायाशी संबंधित दावे दाखल होतात. या दाव्यांची सुनावणी मुंबईत होतअसते. या सुनावणीसाठी आता व्हिडीओ कॉन्फरन्सची (व्हीसी) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकिलांच्या वेळेची बचत होऊन दावे लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे. मुंबईमध्ये दाखल दाव्यांची शुक्रवारपासून पुण्यातूनच सुनावणी सुरू झाली आहे. महारेरा प्राधिकरणाचे सदस्य डॉ. विजय सतबीर सिंग यांनी मुंबई येथून पुण्यातील तक्रारींची सुनावणी घेतली.पुढील काळात या सुविधेत आवश्यकतेनुसार सुधारणा केल्या जातील. अशा प्रकारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचा हा देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावा येथील विभागप्रमुख आणि उपसचिव एफ. डी. जाधव यांनी केला आहे. या सुविधेमुळे वेळ आणि खर्चात मोठी बचत होणार असल्याची माहिती रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नीलेश बोराटे यांनी दिली.
‘महारेरा’ची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 2:15 AM