राजगुरूनगर : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला हृदय विकाराचा झटका आला. अशा परिस्थितीत कुटुंबीय घाबरले असताना पोलिसांनी धाव घेत त्या नागरिकाला वाचवण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. खेड तालुक्यातील निमगाव येथे घडली आहे. १० ते१५ मिनिटे छातीवर पंपीग करून तात्काळ रुग्णालयात दाखल करून जीव वाचवल्याबद्दल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की.आळेफाटा (ता. जुन्नर ) येथील प्राचार्य केशव नामदेव बोरकर (वय ५३ ), व मुलगी तन्वी बोरकर, मुलगा उपेंद्र बोरकर हे खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रांगेत उभे राहून मंदिराच्या गाभ्याऱ्यात दर्शन घेण्यासाठी गेले होते.
दरम्यान केशव बोरकर यांना अचानक चक्कर येऊन गाभ्याऱ्यातील फरशीवर कोसळले. तोंडातून फेस येऊन बेशुद्ध पडले. या घटनेमुळे भाविकांची पळापळ झाली. गाभाऱ्यातील पुजारी भाविक व बोरकर यांचा मुलगा, मुलगी घाबरून गेले. दरम्यान त्या ठिकाणी बंदोबस्त करित असलेले खेड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मोहन अवघडे, सचिन गिलबिले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाभ्याऱ्यातील भाविकांची गर्दी हटवली.
तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बोरकर यांच्या छातीवर १० ते १५ मिनटे पंपीग केले. तात्काळ खाजगी वाहन बोलावून राजगुरूनगर येथील जीवन रक्षक हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. बोरकर यांची प्रकृती स्थिर असून पोलिस हवालदार मोहन अवघडे, व सचिन गिलबिले यांनी तात्काळ मदत करून मला मरणाच्या दारातुन बाहेर काढले अशी प्रतिक्रीया प्राचार्ये केशव बोरकर यांनी व्यक्त केली.