राजू इनामदार
पुणे : ‘पुण्याचे हृदय’ अशी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची ओळख. त्यावर भाजपचा किंवा एका विशिष्ट राजकीय विचारांचा शिक्का बसलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो बहुरंगी, बहुढंगी असा आहे. यात शनिवारवाडा आहे, तसेच मंडईदेखील आहे. कबड्डीचे संघ आहेत, तसेच नामवंत शिक्षणसंस्थाही आहेत. जुनेजाणते पुणेकर आहेत तसाच आयटीत नोकरी करणारा एखादा परप्रांतीय परभाषिकही आहे. मतदार संख्येने कमी असतील, पण विचाराने अनंत आहेत. त्यामुळेच की काय कोणाचे ऐकत नाहीत. ‘हा आमचा बालेकिल्ला’ म्हणणाऱ्यांना तो हळूच धक्का देतो. सनातनी मतदार आहे म्हणताना त्यांनीच आतापर्यंत दोन वेळा महिलांना संधी दिली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल देणारा हा मतदारसंघ पुन्हा एकदा विधानसभेच्या नियमित निवडणुकीला सामोरा जात आहे. त्याची ही खास ओळख.
कसबा विधानसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला होता, असे म्हटले तर आज कोणी विश्वास ठेवेल का? पण ही वस्तुस्थिती आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सन १९५७ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या व्ही. डी. चितळे यांनी या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. १९६२ मध्ये इथून बाबूराव सणस निवडून आले. १९६७ ला रामभाऊ तेलंग विजयी झाले. त्यांनी तत्कालीन समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचा पराभव केला होता. १९७२ च्या निवडणुकीत कसब्याने पुन्हा एकदा धक्कादायक निकाल दिला. लीलाताई मर्चंट या महिला उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यानंतर हा मतदारसंघ एकाच पक्षाकडे कायम राहिला असला तरी अधूनमधून धक्का देण्याची आपली सवय त्याने कायम ठेवली आहे.
सन १९७८ला जनसंघाचे डॉ. अरविंद लेले आमदार झाले. त्यानंतर १९८० मध्ये तेच भाजपचे आमदार झाले. १९८५ ला उल्हास काळोखे यांनी पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात दिला. १९९०ला तो अण्णा जोशी यांनी भाजपकडे घेतला. तेव्हापासून कसबा विधानसभा मतदारसंघ सातत्याने भाजपची पाठराखण करत राहिला आहे. १९९५ ते २०१४ म्हणजे सलग ५ वेळा गिरीश बापट यांनी विजय मिळविला. सन २०१९ ला मुक्ता टिळक आमदार झाल्या. त्यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत २०२३ मध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. हा इतिहास अगदी अलीकडचा. तो सर्वश्रुत आहे.
आवाजाच्या गोंगाटात शनिवारवाडा केविलवाणा
पूर्वीचा सनातनीपणा आता राहिला नाही. मंडईचे महत्त्वही ओसरले आहे. वाहनांची गर्दी आणि आवाजाच्या गोंगाटात शनिवारवाडा केविलवाणा झाला आहे. एकेकाळी वैभवाने ओसंडून वाहणारे वाडे कधी एकदा जमीनदोस्त होतो याची वाट पाहात आहेत. तरीही कसब्याची उमेद कायम आहे. कारण याच कसब्याने यशाची वाट हरवलेल्या पुण्याला एकेकाळी नव्याने उभे केले. बाल शिवाजी महाराजांच्या हाती राजमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर दिला, त्याच्या कथा आजही जिवंत आहेत. कसब्याला तशाच हातांची आता प्रतीक्षा आहे.