खोर: दौंड तालुक्यातील खोर येथे सख्या सासू - सुनेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सासू मुक्ताबाई शंकर डोंबे (वय १०५ वर्ष) यांचे २६ एप्रिलला कोरोनाने निधन झाले होते. त्यांनतर चार दिवसांनी १ मेला सून पारूबाई भाऊसाहेब डोंबे (वय ५५ वर्ष) यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
दोन्ही सासू-सुनेचा ४ दिवसाच्या फरकाने एकाच आठवड्यात निधन झाले आहे. खोर परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून जवळपास ७ ते ८ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर अनेक कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. सध्या खोर भागातील कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. डोंबेवाडी परिसरात अक्षरशः दशक्रिया विधीचेच कार्यक्रम सध्या सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खोर ग्रामपंचायतच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खोरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्रशासन विभागाने ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे म्हणून कित्येक वेळा आवाज उठवला गेला आहे. मात्र प्रशासन विभागाला याबाबतीत काही जाग येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. केवळ प्रशासन विभागाच्या हलगर्जीपणामुळे आज अनेक सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीला चालता-बोलता आपला जीव गमवावा लागत आहे. खोरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दौंड प्रशासन विभागाने ताब्यात घेऊन या ठिकाणी कोव्हीड सेंटर सुरू करण्याची मागणी खोर परिसरातून होत आहे.