पुणे: भरपूर भूक लागलेली असते. भातभाजी खायची नसते. जंक फूडही नको वाटते. अशा वेळी मदतीला येतो तो पराठा. पोटात भरभक्कम भाज्या भरलेला. वरून तूप लावलेला. खरपूस भाजलेला. चपातीला भाजी लावून खायची गरजच नाही. याचा एक घास घेतला की भाजीचपाती एकाच वेळी थेट पोटात.
भटकेगिरीचा इतिहास
पराठ्याचा खरा पंजाबातला. तिथल्या थंडीसाठी आणि घट्ट मनगटांसाठी व भल्या थोरल्या पोटासाठी हा असा भक्कम पदार्थ तयार केला असावा. पण तो आता भारतभर झाला आहे. त्याचे गुणच तसे आहेत. महाराष्ट्रात तर फक्त पराठ्याची म्हणून खास हॉटेल झाली आहेत. पुणे तरी त्याला कसे अपवाद असेल?
साधीच पद्धत
गव्हाचं पीठ, ते मळून त्याचा छान भला मोठा उंडा तयार करायचा. मेथी किंवा मग कोबीपासून ते अगदी गाजरबीटपर्यंत कोणतीही भाजी बारीक करून घ्यायची. त्याआधी अर्थातच धुऊन स्वच्छ तर करायचीच. बटाटा सर्वाधिक प्रसिद्ध. तो वापरायचा असेल तर उकडून त्यात हिरवी मिरची, मीठ, जीरेमोहरी टाकून सारण करायचे. हे सारण त्या उंड्यात बरोबर मध्यभागी भरायचे. मग त्याची पोळी लाटायची. तिला पापुद्रे हवे असतील तर दोनतीन वेळा घड्या घालायच्या. पण सारण फुटू न देता हे करायचे तर त्यासाठी सराव हवा.
कशाबरोबरही चांगला?
तव्यावर हा पराठा टाकला की त्याच्या बाजूने तेल सोडत राहायचे. तवा चांगला तापलेला असेल तर अक्षरश: पाच मिनिटात पराठा तयार होतो. तो भाजला जात असतानाच त्याचा वास पोटातली भूक चाळवतो. त्यावर चीज टाकले की मग तर बहारच. बरोबर साधी कुटाची चटणी खा नाहीतर मग दही, लोणी किंवा गुळाचा खडाही. कशाबरोबरही तो चांगलाच लागतो. मोठ्या हॉटेलमध्ये त्याची किंमतच १०० रुपयांपासून पुढे सुरू होते, त्याचे कारण सजावटच फार. टपरीवर खाल तर मग ५० ते ६० रुपयांत भलाभक्कम पराठा मिळतो. सजावट शून्य, पण बरोबर दही असते. मागितले तर लोणचेही मिळते.
पुण्यात कुठे?
पुण्यातल्या बऱ्याचशा चौपाटीवर आता पराठ्यांच्या स्वतंत्र गाड्या सुरू झाल्या आहेत. पीठमीठ व भाजी चांगली वापरली जात असेल तर खवय्यांना पुन्हा यायला सांगावे लागत नाही. ते येतातच. दरवेळी नवा खाऊगडी घेऊन येतात.
कुठे खाल- श्रीराम पराठा- कर्वे रस्त्यावर दुहेरी उड्डाणपुलाच्या पायथ्यासमोरच्या गल्लीत व हिराबाग चौपाटीवर
कधी - सकाळी ११ नंतर दिवसभरात कधीही