मुंढवा : केशवनगर परिसरात शिवाजी चौकाकडून मांजरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूककोंडीमुळे येथील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मुख्य रस्त्यावर लोणकरवस्ती परिसरात सिग्नल बसवा; अन्यथा येथील वाहतुकीच्या मार्गात बदल करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
केशवनगर परिसर हा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याअनुषंगाने लोकवस्तीही वाढत आहे. केशवनगरची लोकसंख्या ७० ते ८० हजार इतपत झाली आहे. केशवनगर ते मांजरीरोड या रस्त्याचे रुंदीकरण होणेही गरजेचे आहे. पूर्वी केशवनगर भाग हा शेतीचा परिसर म्हणून ओळखला जात होता; परंतु येत्या १० ते १५ वर्षांत इथे शेती विकली गेली. व टुमदार सिमेंटचे इमलेच्या इमले उभे राहिले. केशवनगरच्या सर्व भागात अनेक राज्यातून, जिल्ह्यातून अनेक नागरिक नव्याने सदनिका अथवा भाडेतत्त्वावर राहत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर एकावेळी दोन मोठी वाहने जाण्यासाठी रस्ता अरुंद पडतो. माल वाहतूक करणारा ट्रक याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ये-जा करीत आहेत; तसेच केशवनगरच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा हा रस्ता महत्त्वाचा आहे. मांजरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरूआहे.यामुळे मांजरीकडील वाहतूक केशवनगर येथून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहनांची कोंडी होत आहे.मांजरी रोड एकेरी करावा४केशवनगर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश राऊत म्हणाले की, ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मांजरी रोड व रेणुकामाता मंदिर रोड हा एकेरी वाहतुकीचा करावा; तसेच शिवाजी चौकातून दोन्ही बाजूस वळण्यास बंदी घालावी. मुंढव्याहून शिवाजी चौकात येणारी तीन व चारचाकी वाहने डाव्या बाजूने रेणूकामाता मंदिरापर्यंत जाण्यास परवानगी द्यावी. तेथून ते मांजरी रस्त्याकडे वळून पुढे न्यावीत. जनसेवा बँक व ससाणे कॉलनीतील अरुंद गल्लीतील रस्त्यावरून दुचाकींना परवानगी द्यावी. याविषयीचे निवेदन मुंढवा पोलीस ठाण्याला दिले आहे.