पिंपरी : शहर परिसरात उन्हाचा पारा पुन्हा वाढला असून, कमाल तापमान ३८.६ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिवसभर उन्हाच्या झळा आणि रात्री प्रचंड उकाड्याने हैराण केले आहे. रविवारी तापमान आणि उकाडा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ढगाळ हवामान सरल्यामुळे शहर परिसरात आता तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यातच शनिवारी पुणे शहरापेक्षा पिंपरीचे कमाल तापमान वाढल्याचे दिसले. पुण्यामधील तापमान ३७.४ अंश सेल्सिअस राहिले. त्यापेक्षा पिंपरीचे तापमान १ अंशाहून अधिक राहिले. उद्या हेच तापमान ३९ .१ अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. एसी नसणाऱ्यांना मोटारींमध्ये हवा मिळावी म्हणून चालकांना नाइलाजास्तव काचा खुल्या करून ठेवाव्या लागत आहेत. तर काही वेळ गाडी उभी करून थांबायचे असले, तरी मोटार सुरूच ठेवून एसी फुल्ल करून गाडीत थांबणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या पथारीवाल्यांना उन्हाच्या चटक्यातही काम करावे लागत आहे. सावली मिळण्यासाठी छत्र्यांचा आधार घेतला जात आहे. महामार्गालगत फळविक्री करणाऱ्यांकडून उन्हातील फळांवर भिजलेले कापड ठेवून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. हातगाडीवरील पालेभाज्या कोमेजत असल्याने सायंकाळपर्यंत त्या कमी दरात विकण्याची, प्रसंगी फेकून देण्याची वेळ येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. सायंकाळी ऊन उतरल्यानंतरच घराबाहेर पडण्याचा विचार नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)
उन्हाचा पारा पुन्हा ३८ अंशावर
By admin | Published: May 03, 2015 5:56 AM